मुखवटे सोलताना – सावध ऐका पुढल्या हाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

जगात अनेक जवनिका कार्यरत असतात; ज्या आपल्याला कळत नाहीत. त्यांच्यामुळेच आपण आज सुखी व संपन्न आहोत. या जवनिका हजारो तऱहेने आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी, घरासाठी, संसारासाठी, समाजासाठी हरतर्‍हेने उपयुक्तता व सुविधा पुरवितात, ज्या आपल्या लक्षातही येत नाही. आणि ज्याप्रमाणे आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांचे गुंतागुंतीचे पण एक शिस्तशीर जाळे असते, एक साखळी असते त्याचप्रमाणे निसर्गातही एक साखळी आहे. 

शाळेत असताना सायन्समध्ये पाठ केलेलं उजवी जवनिका- डावी जवनिका! आपल्या शरीरातल्या सगळय़ात महत्त्वाच्या रक्तवाहिन्या! एक शुद्ध रक्त हृदयातून बाहेर नेते! एक अशुद्ध रक्त हृदयात सोडते! अव्याहत शांतपणे चालणारा हा व्यवहार आपल्याला कळतही नाही, पण त्याचमुळे आपण स्वस्थ व निरोगी राहत असतो!

तद्वत जगात अनेक जवनिका कार्यरत असतात; ज्या आपल्याला कळत नाहीत! त्यांच्यामुळेच आपण आज सुखी व संपन्न आहोत! या जवनिका हजारो तऱहेने आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी, घरासाठी, संसारासाठी, समाजासाठी हरतऱहेने उपयुक्तता व सुविधा पुरवितात, ज्या आपल्या लक्षातही येत नाही. आणि ज्याप्रमाणे आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांचे गुंतागुंतीचे पण एक शिस्तशीर जाळे असते, एक साखळी असते त्याचप्रमाणे निसर्गातही एक साखळी आहे… जगातल्या जवनिका! पहिली आहे समुद्र! दुसरी आहे वृक्ष… जंगल…पर्वत! तिसरी आहे अभयारण्यातले पशु, पक्षी, जनावरं!

अगदी बाळबोध उदाहरणं घेतलं तरी, समुद्रातून आपल्याला अफाट फायदे मिळतात. मासे, मीठ, तेल, पाणी, जलवाहतुकीसाठी तसंच समुद्राजवळ वाऱयाचं तपमान कमी होतं. ओझोन वायू जास्त असतो. समुद्राजवळ जाण्यानं मन शांत होतं. हा एक दुर्लक्षित घटक, पण महत्त्वाचा!

तुम्ही पहा, प्रेक्षणीय स्थळांइतकीच समुद्रकिनाऱयावर लोक जास्त असतात न् त्यांच्या चित्तवृत्ती उल्हसित, प्रफुल्लित असतात! पण त्याच समुद्रात रासायनिक द्रव्य, सांडपाणी, तेलाचं गलबत फुटलं की त्यामुळं असंख्य मासे मरून पडतात. तेच मासे आपल्या खाण्यात येऊ शकतात.

त्याच समुद्रात नुकतंच सुएझ कालव्यात एक अजस्र जहाज काय अडकलं, अख्ख्या जगातल्या व्यापारउदिमांचा श्वासच थबकला! जणू घशात घास अडकावा न् प्राण कंठाशी यावे… जणू जवनिकेत ब्लडक्लॉट निर्माण होऊन हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित व्हावा! लाखो टन माल घेतलेली अनेक जहाजं अडून बसली. त्यामुळे देशात माल पोचेना… नऊ अब्ज कोटींचं रोजचं नुकसान पैशात दिसत होतं पण जर का माल पोचलाच नसता तर काही काळ अन्नधान्य, इंधन या सर्वच प्रकारांचा तुटवडा जाणवला असता.

दुसरी साखळी वृत्त, जंगल, पर्वत. आता वाढलेलं संकट म्हणजे गारपीट, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ हे सर्व आपणच अमाप वृक्षतोड जंगलतोड करून ओढवलेली संकटं आहेत. झाडांमुळे फक्त फळं, फुलं मिळतात असं नाही, तर त्यामुळे पक्षी-पक्ष्यांची घरटी… प्रजनन होत असतं… वारे, पाऊस, ढग यांना अडवलं जातं. जंगल, पाण्यामुळे जमीन सुपीक होते… हल्लीच एक भयानक इतिहासातलं काळं पान वाचलं न् अंगावर काटा आला. चीनमध्ये काही वर्षांपूर्वी तिथल्या राष्ट्रप्रमुखांनी एक विचित्र अभियान चालवलं. अर्थव्यवस्था जास्त मजबूत व जगात नंबर एक राहण्यासाठी धान्याचं उत्पादन जास्त करण्यासाठी व नंतर निर्यात करून अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी  धान्य खाणारे चार प्रकारचे किडे मारण्याची योजना!

चिमण्या, उंदीर, माशा आणि पाखरं. आणि सुरू झाले एक भयंकर अघोरी हिंसासत्र… चीनमध्ये ‘ग्रेट किल स्पॅरो कॅम्पेन’ चालवलं गेलं… छोटय़ा चिमण्यांना टिपून मारून ट्रकभर भरून त्यांना नष्ट केलं गेलं. तरुण मुलांचे घोळके चिमण्या पाखरांना मारून त्यांच्या माळा घेऊन हिंडू लागले… दोनच वर्षांत चिमण्या पाखरांची प्रजाती चीनमधून नष्ट झाली न् निसर्गाचा समतोल बिघडला… चिमण्या पाखरं हे धान्याबरोबर इतरही किडेमकोडे खाऊन निसर्गाचा बॅलन्स सांभाळत असतात. त्यानंतर चिमण्या पाखरं नष्ट झाल्याबरोबर टोळधाड, साप, इतर किडे यांची इतकी बेसुमार वाढ झाली की, ती आवरणं कोणाच्याही हातात नव्हतं. एका मिनिटात टोळधाड पूर्ण पीक खाऊन पुढल्या गावी हल्ला करायला जात होती. एवढा मोठा कृषिप्रधान चीन; पण गावेच्या गावे पूर्ण पीक नष्ट होऊन सुका दुष्काळ इतका की अडीच कोटी लोक उपासमारी, भूकबळीनं मेले! निसर्गाचा समतोल बिघडवणारी ही एक चूक अडीच कोटी लोकांचे प्राण घेऊन गेली! यावरून एक लक्षात येते की, ही निसर्गाची साखळी किती गुंतागुंतीची, पण किती दूरवर पोहोचलीय. एक छोटी चिमणी नष्ट केल्यानं पुढं काय भयंकर घडलं! तर आता तर आपण चिमण्या नाही, तर वाघ, जंगलं, झाडंही नष्ट करून राहलोय. समुद्राला मागं हटवून त्याचीही जमीन घेऊन राहिलोय. वाघांचा अधिवास त्यावर पण अतिक्रमण करून राहिलोय… सावध ऐका पुढल्या हाका… पर्यावरणाची साखळी मानवी जीवनाचं हृदय आहे! सांभाळा!

कालचीच बातमी आहे, गोरेगाव आणि बोरीवलीमध्ये बिबटय़ा हिंडताना दिसला. त्यानं एका कुत्र्यावर हल्लाही चढवला.आता तो आपल्या इतक्या जवळ कसा काय आला? अफाट जंगलतोड करत आपण त्यांच्या अधिवासात गेलो! आणि आपण राहत असलेल्या ठिकाणी कुत्रे आणि आदिवासी पाडय़ात बकरे, गायी वगैरेही असतातच. भक्ष्याच्या शोधार्थ बिबटे-वाघ कितीही दूर जातात. आपणही नाही का पोटासाठी, नोकरीसाठी दुसऱया प्रांतात जाऊन राहत! तर जास्तीत जास्त जमीन आक्रमित करण्याची आपली हाव. यामुळं ते आपल्या वस्तीत नाही, तर आपण त्यांच्या वस्तीत गेलो आहोत! असंच जर चालू राहिलं तर उद्या ते आपल्यावरही हल्ला करू शकतील आणि मग ते आपल्याला ठार मारतात म्हणून आपण त्यांना ठार मारू! हे दुष्टचक्र कसं थांबणार?

एकीकडे ‘वाघ वाचवा, झाडं वाचवा’ म्हणून आंदोलन करत आरोळय़ा ठोकायच्या न् एकीकडे त्यांची सर्रास कत्तल करायची. आपण पर्यावरणाला जपलं नाही तर पर्यावरण व पर्यायाने निसर्ग आपला कायदा दाखवेल. तेव्हा… सावध ऐका पुढल्या हाका!

[email protected]