मलकापुर येथे तरुणाची गोळया घालून हत्या

1272

आगाशिवनगर-मलकापूर येथे बुधवारी रात्री दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आगाशिवनगर (ता.कराड) येथील जॅकवेलकडे जाणा-या रस्त्यावर तरुणावर हल्ला करण्यात आला. विकास उर्फ विकी रघुनाथ लाखे (रा. दांगटवस्ती मलकापूर) असे तरुणाचे नाव आहे. टोळीयुद्धातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे.

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी विकासवर बेछूट गोळीबार केला. यात चार ते पाच गोळ्या विकासला लागल्या होत्या. गोळीबारानंतर विकासला तात्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव दाखल झाले. गोळीबाराच्या या घटनेमुळे आगाशिवनगर मलकापूर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कराड तालुक्यात काही महिन्यांपासून टोळीयुद्ध भडकले आहे. यातून हत्येसारख्या भयंकर घटना घडत आहेत. तालुक्यात वर्चस्ववादातून अधूनमधून अशा घटना घडतात. ऑगस्ट महिन्यात मध्यरात्रीच्या सुमारास टोळीच्या वर्चस्ववादातुन पवन सोळवंडे यांचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सतरा जणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना ताजी असतानाच मलकापूर- आगाशिवनगर येथील परिसरातील रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन ते चार जणांनी विकास उर्फ विकी लाखे ( 30 ) याच्यावर बेछूट गोळीबार करत पळ काढला.गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील लोकांनी त्या दिशेने धाव घेतली असता विकास रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर गंभीर अवस्थेत असल्याचे दिसले. त्या ठिकाणी गोळा झालेल्यांपैकी काही युवकांनी विकासाला तात्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र रक्तस्राव मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे उपचारादरम्यानच विकासचा मृत्यू झाला.

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या