मल्लखांबचे बादशहा दत्ताराम दुदम यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली चार दशकांपेक्षा जास्त काळ मल्लखांब या खेळाशी संबंधित तसेच शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू दत्ताराम दुदम यांचे 7 ऑक्टोबर रोजी कोरोनाच्या आजाराने सेव्हन हिल रुग्णालयात निधन झाले. निधनासमयी ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी स्मिता दुदम, दीपाली, कृपाली या दोन मुली असा परिवार आहे.

वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्यांनी सुधाकर देखणे व उदय देशपांडे यांच्याकडे दादर शिवाजी पार्क येथील समर्थ व्यायाम मंदिरात मल्लखांब या खेळाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. या खेळातील कौशल्यामुळे महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. या खेळामुळेच पश्चिम रेल्वेने त्यांना आपल्या सेवेत समावून घेतले. या खेळाने त्यांना स्थैर्य दिल्यामुळे ते या खेळात संघटक म्हणून कार्यरत झाले. उपनगर जिल्हा मल्लखांब असो. स्थापना झाल्यानंतर ते 12 वर्षे या संघटनेचे कार्यवाह होते, तर 4 वर्षे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे गेली कित्येक वर्षे ते सहकार्यवाह म्हणून कार्यरत होते. त्यांनी या खेळाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शिवजयंती, गुढीपाडवा यांच्या शोभायात्रेत किंवा विविध सणांच्या किंवा स्पर्धेच्या निमित्ताने ते मल्लखांब याचे प्रात्यक्षिक करून या खेळाचा प्रचार व प्रसार करीत असत.

विविध क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्था, राजकीय पुढारी यांना हाताशी धरून त्यांनी जोगेश्वरी ते दहिसर या परिसरात 20-25 मल्लखांब केंद्र नियमित सुरू केली. दत्ताराम दुदम यांनी खेळाडू, प्रशिक्षक, पंच, कार्यकर्ता, संघटक या विविध भूमिका व्यवस्थित पार पाडत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले होते. दत्ताराम दुदम यांच्या निधनानंतर क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने मल्लखांब या खेळाची अपरिमित हानी झाली आहे.