
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, माझ्या रक्तात सिंदूर वाहतोय… असे असेल तर मग भाजपचे जे वाचाळवीर नेते ऑपरेशन सिंदूरवरून कर्नल कुरेशी आणि महिलांचा अपमान करताहेत त्यांची तत्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतीलविरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी फटकारले आहे. खरगे यांनी एक्सवरून भाजप नेते आणि मोदींवर जोरदार निशाणा साधला.
भाजपचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा यांच्या अत्यंत अपमानजनक वक्तव्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची छोटी मानसिकताच समोर आली आहे, असा संताप खरगे यांनी व्यक्त केला. मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी आपल्या कर्तबगार सैन्याचा अपमान केला; परंतु मोदींनी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. भाजप खासदार आणि मंत्री विजय शहा यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगाला देणारी विरांगणा कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी केली. त्यांना आजपर्यंत पदावरून दूर करण्यात आलेले नाही. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नौदलाच्या अधिकाऱयाच्या पत्नीला सोशल मीडियावरून ट्रोल करण्यात आले, तेव्हाही मोदी गप्प बसले होते, याची आठवण खरगे यांनी करून दिली आहे.