युद्धविरामावर मौन बाळगलं, आता ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर केलेल्या आरोपांवरही मोदी गप्प राहतील का? – मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर मौन बाळगल्याबद्दल जोरदार टीका केली आहे. खरगे यांनी X वर एक पोस्ट करत पंतप्रधानांना लक्ष्य करत म्हटलं आहे की, “ट्रम्प यांच्या युद्धविरामावरील विधानांवर दींनी संसदेत मौन बाळगलं होतं. आता आता ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर केलेल्या निराधार आरोपांवर मोदी गप्प बसतील का?”, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या पोस्टमध्ये ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ आणि दंड लादण्याची घोषणा केली आहे. यामुळे हिंदुस्थानच्या व्यापाराला मोठा फटका बसणार असून, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) आणि शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होणार आहे. अनेक उद्योगांचेही नुकसान होण्याची भीती आहे.” खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “नमस्ते ट्रम्प” आणि “अबकी बार ट्रम्प सरकार” या घोषणांमुळे हिंदुस्थानला मित्रत्वाचा हा परिणाम भोगावा लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

खरगे यांनी मोदी सरकारला स्वतःची जाहिरात करण्याचं सोडून देशाच्या हितासाठी काम करण्याचा सल्ला दिला आहे. “देश सर्वप्रथम आहे आणि आम्ही देशासोबत आहोत,” असे सांगत त्यांनी सरकारला या बाबत तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.