दुसऱ्यांच्या घरातल्या खुर्च्या उधार घेऊन PM मोदींवर आपलं घर सांभाळण्याची वेळ; मल्लिकार्जुन खरगे यांचा टोला

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पीएम मोदींनी मागची गॅरंटी पूर्ण केली नाही. आणि आता गाजावाजा करत आहेत, असा जोरदार टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट केले आहे. लोकसभा निवडणुकीत देशाने असं उत्तर दिलंय की मोदी सरकारला दुसऱ्यांच्या घरातील खुर्च्या उधार घेऊन आपलं सत्तेचं घर सांभाळण्याची वेळ आली आहे. 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर छत असेल, अशी गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जुलै 2020 ला देशाला दिली होती. ही गॅरंटी पोकळ ठरली, अशी टीका खरगे यांनी केली. आता तीन कोटी घरं देण्याचा डंका पिटण्यात येत आहे. हा डंका असा पिटला जातोय, जसं आधीची गॅरंटी पूर्णच केलीय. देश सत्य जाणून आहे, असे खरगे पुढे म्हणाले.

काय म्हणाले खरगे?

तीन कोटी घरांसाठी कुठलीही कालमर्यादा देण्यात आलेली नाही. कारण भाजपने गेल्या 10 वर्षांत काँग्रेस-यूपीएच्या तुलनेत 1.2 कोटी घरं कमी उभारली. काँग्रेसने 4.5 कोटी घरं बांधली होती. तर भाजप 2014-24 दरम्यान 3.3 कोटी घरंच बांधू शकली, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या आवास योजनेत 49 लाख शहरी आवास आहेत. म्हणजेच 60 टक्के अधिक निधी जनतेने आपल्या कमाईतून भरला आहे. एका सरकारी अंदाजानुसार शहरातील एक घर सरासरी 6.5 लाखात बांधण्यात येतं. त्यापैकी केंद्र सरकार फक्त 1.5 लाख रुपये आर्थिक मदत देत आहे. यात 40 टक्के योगदान राज्ये आणि नगरपालिकांचेही असते. उरलेला बोजा हा जनतेच्या माथी मारला जातो. असे संसदीय समितीन म्हटले आहे, असे खरगे म्हणाले.

तीन कोटी घरं बांधणीला मंजुरी

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली समोवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. त्यात बैठकीत पंतप्रधान आवास योजनेनुसार (PMAY) तीन कोटी घरं बाधण्यासाठी सरकारच्या आर्थिक मदतीला मंजुरी देण्यात आली.