मालवण शहर दोन दिवस अंधारात: आमदार नाईक यांची अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. वीज तारा तुटल्या असून वीज खांब कोसळले आहेत. मालवण शहरासह अनेक गावे दोन अंधारात आहेत.

दरम्यान, मालवण दौऱ्यावर असलेल्या आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी मालवण वीज कार्यालयात भेट देत माहिती जाणून घेतली. अधिकारी व कर्मचारीवर्ग वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लाईनवर असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी आमदार नाईक यांनी कार्यकारी अभियंता गवळी व अधीक्षक अभियंता पाटील यांना संपर्क साधून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती पंकज सादये, शहरप्रमुख बाबी जोगी, पस सदस्य मधुरा चोपडेकर व अन्य उपस्थित होते.

ग्रामीण भागात, देवबाग, तळाशील, साळेल यासह अनेक गावांत वीज पुरवठा खंडित आहे. त्याठिकाणी जादा कर्मचारी कुमक पाठवून गावातील वीज पुरवठाही लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पावसाचा जोर कायम असल्याने जंगलमय भागात कोसळलेले ३३ केव्ही विद्युत वाहक वीज खांब उभारण्यात अडचणी येत आहेत. मात्र लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती वीज वितारणने दिली.