मालोंड-मालडीच्या बंधाऱ्याच्या कामास अखेर सुरुवात, राज्य शासनाकडून 8 कोटी मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालोंड – मालडी या दोन गावाना जोडणाऱ्या गडनदीवरील बंधारा मागणीची चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. 206 मीटर लांबीचा व 8.60 मीटरच्या 69 गाळ्यांच्या बंधाऱ्यासाठी 8 कोटी रुपये राज्य शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आहेत. बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती जलसंधारण विभाग आंबडपाल, सिंधुदुर्गचे अभियंता देवशेटे यांनी दिली.

यावेळी मालोंड सरपंच वैशाली घाडीगावकर, ग्रामसेवक श्री. जाधव, पोलिस पाटील पांडुरंग तांडेल, सुहास सुर्वे, कमलाकर सुर्वे, सुभाष परब, गोविंद परब, मंडळाचे अध्यक्ष जयवंत पांजरी, उपाध्यक्ष फटू नारायण घाडीगावकर, गोविंद वाडकर, बाळा पारकर, भाऊ नाना घाडीगावकर, आबा घाडीगावकर, बाळा परब, विक्रांत घाडीगावकर व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

मालोंड – मालडी गावच्या मधून गडनदी वाहते. पावसाळ्यात गडनदीला महापूर येतो. त्यामुळे आजुबाजुच्या गावाचा संपर्क तुटतो. नदीतून साध्या होडीने प्रवास असल्याने, मुसळधार पावसात पूर स्थिती निर्माण झाल्यावर आडवली हायस्कूलमध्ये जाणार्‍या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत होते. कणकवली येथे जाण्यासाठी आडवली मार्गे एसटी ने प्रवास करावा लागतो. परंतु नदीला पूर आल्यावर औषधोपचारासाठी जाणार्‍या रुग्णांचे, वृध्दांचे, गरोदर स्रियांचे हाल होतात. यासाठी अनेक वर्षे मालोंड -मालडी गावचे ग्रामस्थ गडनदीवर ब्रिज बांधण्याची मागणी करत होते. ती मागणी आता पुर्ण होत असल्याने दोन्ही गावाबरोबर परीसरात समाधान व्यक्त होत आहे.

101-250 हेक्टर सिंचन क्षमतेच्या को.प. बंधारा मृदा व जलसंधारण विभागाच्या सन 2017-18 च्या दरसूचीवर आधारीत कामासाठी 7,98,73,567 किंमतीस प्रशासकीय मान्यता आहे. या योजनेच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार सिंचन क्षमता 145 हेक्टर आहे. या योजनेच्या कामावरील खर्च हा महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून केला जाणार आहे.

या बंधाऱ्यासाठी आमदार वैभव नाईक, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. यासह पूर्वा वाडकर यांनीही वेळोवेळी प्रश्न उपस्थित करुन शासनाचे लक्ष वेधले.

तसेच कोकण विकास आघाडी अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्यास बहुमोल सहकार्य केले. मालोंडचे तरुण उत्कर्ष मंडळाचे मोठे योगदान आहे. याबरोबर अनिल परब, कमलाकर सुर्वे, बाळा मालोंडकर, वैभव परब, भाऊ तांडेल यांनी व ग्रामस्थांनी मोठे प्रयत्न केले.