मालवण शहरातील खड्डेमय रस्त्यांचा प्रवास संपणार, दीड कोटी निधीतून रस्ता दुरुस्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण शहरातील नादुरुस्त व खड्डेमय रस्त्यांवरील डांबरीकरण कामे नगरपालिकेने हाती घेतली आहेत. दर्जेदार व गतिमान रित्या ही कामे सुरू असून लवकरच सर्व कामे पूर्ण केली जातील, असा विश्वास नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी व्यक्त केला आहे.

शहरातील खराब झालेल्या रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण करण्याच्या सुमारे 1 कोटी 67 लाख रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली होती. डिसेंबर अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होतील. हा नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी महिनाभरापूर्वी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. याबाबत नागरिक व वाहनचालकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. डांबरीकरण कामाची सुरुवात वाघ पिंपळ ते रामेश्वर कॉम्प्लेक्स या मार्गावर झाली. गुरुवारी माघी गणेश चौक ते कोळंब सागरी महामार्ग या मुख्य मार्गावरील डांबरीकरण काम हाती घेण्यात आले. या कामाचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक यतीन खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

नगरसेवक मंदार केणी, दर्शना कासवकर, सुनीता जाधव या सर्वच स्थानिक नगरसेवक यांनीही माझ्यासोबत या रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र आचारसंहिता कालावधी व नंतर पावसाळा असल्याने कामास विलंब झाला. असे नगरसेवक खोत यांनी सांगितले. रस्ता भूमिपूजन प्रसंगी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेविका सेजल परब, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपूटे, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, संजय गावडे, राजू परब, गणेश चिंदरकर, शिल्पा खोत, शांती तोंडवळकर, स्वप्नील आचरेकर, उमेश हर्डीकर, नंदा सारंग, सुधीर धुरी, रोहित मेतर व नागरिक उपस्थित होते.

शहरातील खड्डेमय बनलेले व दुरुस्तीसाठी मंजूर झालेले अन्य मुख्य मार्ग व छोटे रस्ते यांची कामेही अधिक जलद गतीने पूर्ण करावी. वाहनचालक व नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आगामी कालावधी पर्यटन हंगाम लक्षात घेता पर्यटक वाहनांना त्रास होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी. अश्या सूचना नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी संबंधित ठेकेदारास दिल्या.