भगव्या उत्साहात शिवसेनेचे मालवणात ‘प्रथम ती’ महिला संमेलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मालवण येथे आयोजित ‘प्रथम ती’ या महिला संमेलनास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. भगव्या साडी परिधान करून आलेल्या महिलांमुळे संमेलनात भगवा उत्साह दिसून आला. महिलांचा सन्मान ही शिवसेनेची शिकवण असल्याचे मत यावेळी सर्वच मान्यवरांनी व्यक्त केले.

दरम्यान, उपस्थित महिला व सर्वच मान्यवरांनी विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकणारच असा ठाम विश्वास व्यक्त करताना आमदार वैभव नाईक पुन्हा आमदार होणारच असे सांगत त्यांना मंत्रीपदासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रथम ती’ हा महिला संमेलन कार्यक्रम सर्वत्र राबवला जात आहे. मालवण वायरी येथील आर जी चव्हाण सभागृह येथे पार पडलेल्या या सम्मेलनात मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ, शिवसेना महिला आघाडी नेत्या शीतल म्हात्रे व संजना घाडी यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी आमदार वैभव नाईक, महिला आघाडी जिल्हा संघटक जानव्ही सावंत, उपजिल्हा संघटक सेजल परब, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेविका तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, वर्षा कुडाळकर, श्रेया परब, श्वेता सावंत, दीपा शिंदे, अंजना सामंत, पूजा तोंडवळकर, रश्मी परुळेकर, नंदा सारंग, नितीन वाळके, अनंत पाटकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. शिवसेना प्रवेश केलेल्या नगरसेविका दर्शना कासवकर, शीला गिरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महिलांना सन्मान देण्याचे काम शिवसेनेने केलं. तळागाळातील महिलांचा सन्मान शिवसेनेने केला. मतदारसंघात गावागावात वाडीवस्तीवर पोहचून विकास साध्य केला.

शिवसेनाप्रमुखांचे बाळकडू

महिलांचा सन्मान करण्याचे बाळकडू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकाना दिले.
आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना यशस्वी वाटचाल करत असताना बाळासाहेबांची शिकवण युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात रुजवत आहेत. असे आमदार वैभव नाईक यांनी महिला संमेलनाच्या निमित्ताने स्पष्ट केले.