मालवणच्या सुपुत्राची देशात पताका, चिंदरचे रहिवासी सुब्रमण्य केळकरचे ‘यूपीएससीत’ घवघवीत यश

1376

मालवण तालुक्यातील चिंदर गावाचे रहिवासी असलेल्या सुब्रमण्य भालचंद्र केळकर (वय – 27) याने यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मातृभाषेतून देशात 497 क्रमांक येऊन घवघवीत असे यश संपादन करत मालवणची (सिंधुदुर्ग) पताका देशात फडकवली आहे. सर्व स्तरातून सुब्रमण्य याचे कौतुक होत आहे.

सुब्रमण्य भालचंद्र केळकरने प्राथमिक शिक्षण चिंदर तर माध्यमिक शिक्षण त्रिंबक येथे मराठी माध्यमातून झाले. महाविद्यालयीन शिक्षण टोपीवाला हायस्कूल मालवण येथे झाले. त्यांनंतर त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. मागील 3 वर्षे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेसाठी मराठी माध्यमातून सुब्रमण्यम भालचंद्र केळकरने प्रयत्न चालू केला होता. पुण्यातील चाणक्य मंडल परिवारमध्ये शिक्षण घेत अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचा अभ्यास त्यांनी केला. यूपीएससी पूर्वपरीक्षा पास होत मुख्य परीक्षा त्यानी दिली. एका प्रयत्नात मुलाखतीमध्ये 11 मार्क कमी मिळाल्याने निवड राहिलेली होती. मात्र अथक मेहनतीच्या व प्रत्येक मिनिटांचा सदुपयोग करत आपले प्रयत्न त्यांनी चालू ठेवले. यशाला गवसणी घालत देशात 497 रँकने त्यांची निवड झाली.

माझ्या यशात माझे कुटुंबिय, चिंदर गावात पौराहित्याचे काम करणारे वडील, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली पाच वर्षे पोलीस सेवेत कार्यरत असलेला मोठा भाऊ मकरंद तसेच माझा मित्रपरिवार असा सर्वांचाच वाटा असल्याचे सुब्रमण्य यांनी सांगितले.

दहावी बारावी परीक्षेत कोकणची मुले राज्यात अव्वल यश संपादन करत असताना एमपीएससी, यूपीएससी परीक्षेत हीच मुले काहीशी मागे पडतात असे चित्र होते. काही वेळा या परीक्षा देण्याचा कल येथील मुलांमध्ये दिसून येत नव्हता. मात्र मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन मराठी माध्यमातून यूपीएससी परीक्षा देत सुब्रमण्य यांनी मिळवलेले यासह सिंधुदुर्गसह तमाम कोकणवासीय विध्यार्थी वर्गाला आदर्शवत असेच आहे. हाच आदर्श घेत यापुढे येथील मुलेही यूपीएससीत सिंधुदुर्गचा डंका निश्चित पिटवतील यात शंका नाही.

आपली प्रतिक्रिया द्या