
वायरी येथील एक पर्यटन व्यावसायिक बुधवारी दीड लाखाची रोख रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी जात होता. यावेळी बँकेत गेल्यावर दुचाकीला अडकवलेली रक्कम असलेली पिशवी नसल्याचे दिसून आले. काहीसा घाबरलेल्या त्या व्यवसाईकाने रस्त्यात पैशाची पिशवी पडली असावी असा अंदाज केला. मित्रांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली. मात्र रक्कम असलेली पिशवी सापडून आली नाही.
वायरी भूतनाथ येथील प्रमोद हडकर हे मालवणहून घरी जात होते. त्यांना दीड लाख रक्कम असलेली पिशवी रस्त्यात पडलेली दिसली. हडकर यांनी पैशाची पिशवी उचलली आणि ती कोणाची आहे याबाबत चौकशी करू लागले. या दरम्यान, वायरी येथील एका पर्यटन व्यावसायिकाची पैसे असलेली पिशवी रस्त्यात पडल्याचे व तो शोधाशोध करत असल्याचे त्यांना समजले. यावेळी हडकर यांनी तात्काळ संबंधित पर्यटन व्यावसायिकाशी संपर्क साधत योग्य खातरजमा केली. अन दीड लाखाची रक्कम त्याच्याकडे सुपूर्द केली.
प्रमोद हडकर यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. तरीही कोणताही लोभ न दर्शवता त्यांनी रस्त्यात सापडलेली लाखो रक्कम कोणतीही अपेक्षा न ठेवता परत केली या बद्द्ल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. आजच्या काळात माणूसकी आणि प्रामाणिकपणा हरवत चालला असताना प्रमोद हडकर यांनी दाखवलेला लाख मोलाचा प्रामाणिकपणा सर्वांसाठी आदर्शवत असाच आहे.


























































