मालवणात घोंगवणारे वारे व पावसाचा कहर, पडझडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान

349

मालवण शहर व तालुक्यात वादळी वारे व पावसाचा जोर दुसऱ्या दिवशी कायम होता. अनेक ठिकाणी झाडे कोसळून तसेच पडझडीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी खंडित झालेला वीज पुरवठा बुधवारी दुपार पर्यंत खंडित होता. मोबाईल व दूरध्वनी सेवाही ठप्प झाली होती.

दरम्यान, पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. ग्रामीण भागात काही ठिकाणी शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. दिवसभरात १२१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर १ जून पासून आतापर्यंत तब्बल ३ हजार ७०० मिलिमीटर पाऊस मालवणात कोसळला आहे.

गेले दोन दिवस समुद्र अधिकच खवळला असून मोठ्या लाटा उसळत आहेत. तर किनारपट्टीवर जोरदार वारे घोंगावत आहेत. बंदर विभागाने धोक्याचा तीन नंबरचा बावटा लावला आहे. अशी माहिती बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांनी दिली.

दुसरीकडे वादळी वाऱ्यांमुळे पडझडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तालुक्यात अनेक गावांत झाडे कोसळून, मांगर कोसळून नुकसान झाले आहे. वायंगणी येथे गोठ्यावर झाड कोसळून जनावरे जखमी झाली आहेत. आपत्ती विभाग तालुक्याच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे.

नगराध्यक्षांकडून शहरात पाहणी

मालवण शहरातही पडझडीमुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. पालिका कर्मचारी भर पावसात गेले दोन दिवस अखंडितपणे मदतकार्य करत आहेत. शहरातील नुकसानग्रस्त ठिकाणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत यांनी पाहणी केले. काही घरे, दुकाने यांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहेत. दरम्यान नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर शासन स्तरावरून मदत मिळावी यासाठी तहसीलदार अजय पाटणे यांची भेट घेऊन नगराध्यक्ष व बांधकाम सभापतींनी चर्चा केली. तसेच नुकसानीचा आढावा घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या