हिंदुस्थानी सैनिकांच्या हातावर यावर्षीही मालवणातील विद्यार्थीनी बांधणार राख्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावासाठी हा संदेश देत मालवणातील विद्यार्थिनींनी स्वत:च्या हाताने बनवलेल्या सुमारे 10 हजार 510 राख्या हिंदुस्थानी सैनिकांना पाठविल्या आहेत. हा अनोखा उपक्रम मालवण येथील भंडारी ए.सो.कनिष्ठ महाविद्यालय नुकताच पार पडला.

पोष्ट सेवेच्या माध्यमातून या राख्या रक्षाबंधन पूर्वी भारतीय वायुदल, नौदल व भूदल (लष्कर) या तिन्ही दलांतील जवानांपर्यत पोहचणार आहेत. भंडारी कॉलेजच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक तहसीलदार अजय पाटणे व उदोजक दीपक परब यांनी केले.

तहसीलदार अजय पाटणे, भंडारी हायस्कुलचे माजी विध्यार्थी तथा मुंबईस्थित उदोजक दीपक परब, पोष्ट मास्टर मुगधा मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत जवानांना राखी पाठण्याच्या अनोखा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मुख्याध्यापक वामन खोत, पर्यवेक्षक हनुमंत तिवले, प्राध्यापक पवनकुमार बांदेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, सुनंदा वराडकर, वैभवी वाक्कर, प्रभूदास आजगावकर, गुरुदास दळवी, गणेश सावंत, स्नेहल पराडकर आदी उपस्थित होते. विद्यार्थिनींनी तहसीलदार अजय पाटणे यांना यावेळी प्रतिनिधीक स्वरूपात राखी बांधली.

प्राध्यापक पवनकुमार बांदेकर यांच्या संकल्पनेतून व संस्था अध्यक्ष विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षे सुरू असलेला हा उपक्रम शिक्षक, विध्यार्थी यांच्या सहकार्यातून यशस्वी होत आहे. मुलांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी मुलांमध्ये राष्ट्रीय संस्कार व्हावेत या हेतूने हा उपक्रम राबवत असल्याचे प्राध्यापक पवनकुमार बांदेकर यांनी सांगितले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा व महाविद्यालये बंद असूनही विद्यार्थीनींनी गट करून घरीच राहून तब्बल 10510 राख्या बनविल्या. राख्या पाठविण्यासाठी टेक्नोव्हा, मुंबईचे मालक मंगेश कुलकर्णी यांचे तसेच डॉ. दीपक परब यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.

पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपुर, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्किम, जम्मू-कश्मीर, लेह-लहाख, तसेच नौदलासाठी कारवार नेव्ही डॉक, मुंबई नेव्ही, पोरबंदर नेव्ही कोच्ची नेव्ही, विशाखापट्टनम, पोर्ट ब्लेयर-अंदमान व निकोबार, भारतीय वायू दलातील पठाणकोट, हरियाणा, पूलवामा, लेह-लद्दाख, जम्मू-काश्मिर, उधमपूर इत्यादि ठिकाणी देश रक्षणाचे कार्य करणाऱ्या तीनही सैन्य दलातील सैनिकांना राख्या पाठविण्यात आल्या.

रक्ताचे नाते असलेला भाऊ फक्त बहिणीचे रक्षण करतो मात्र आपण भारतमातेचे रक्षण करत आहात व देशसेवेचे पवित्र कार्य आपल्याकडून अविरत घडत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना असा शुभ संदेश व कविता राख्या सोबत विद्यार्थिनी सैनिकांसाठी पाठवत आहेत. अशी माहिती यावेळी प्रा. पवन बांदेकर यांनी दिली.

यावेळी बोलताना तहसीलदार अजय पाटणे म्हणाले, रक्षाबंधन हा असा सण आहे जो आपण इतिहास काळापासून साजरा करतो. आपल्या ग्रंथांमध्ये देखील रक्षाबंधनाचा उल्लेख केला आहे. हा सण भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेमाचा सण म्हणून साजरा केला जातो. भंडारी ज्युनिअर कॉलेज असे अनेक सामाजिक उपक्रम आयोजित करत असतात. इथे उपस्थित असणारे विद्यार्थी व या उपक्रमात सहभागी असून हजर न राहू शकलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले पाहिजे. तुम्ही स्वतः राख्या बनवून भारतातील वेगवेगळ्या सीमा भागांवर पाठवित आहात. सीमेवरील जवान हे रात्रंदिवस आपल्या सर्वांची रक्षा करीत असतात. या उपक्रमामधून तुमच्या मधील जवानांविषयी ज्या भावना आहेत त्या दिसून येतात. आतंकवादी हल्ले, नक्षलवाद यापासून आपले बचाव करण्यासाठी ते आपल्या जीवाची बाजी लावून काम करत असतात. या उपक्रमामुळे सैनिकांमध्ये एक वेगळी इच्छा शक्ती निर्माण होऊन ते अजून उत्साहाने सेवा बजावतील असे सांगितले.

यावेळी प्राचार्य व्ही. जी. खोत यांनीही विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाचे कौतुक करत आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी मानले.