मालवणात दोन लाखांची लाच घेताना दोघा मत्स्य अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण येथील प्रभारी सिंधुदुर्ग जिल्हा सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त व परवाना अधिकारी शिवराज चव्हाण (रत्नागिरी) यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या दोघांनी दोन लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्यानंतर मत्स्य विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचा पर्ससीन मासेमारी ट्रॉलर पकडण्यात आला होता. त्या बोटीवर कारवाई न करण्याच्या अटीवर प्रदीप वस्त व शिवराज चव्हाण यांनी एका मासेमारी व्यवसायकाकडून पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 2 लाख रुपये शनिवारी देण्याचे ठरले होते. याबाबत त्या व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार अधिकारी महेश पाटील, मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी दीपक कांबळे, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, मितेश केणी, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर, पोलीस नाईक रवींद्र पालकर, अजित खांडे, प्रथमेश पोतनीस आदी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शनिवारी सायंकाळी छापा टाकला.

वस्त व चव्हाण यांना रविवारी जिल्हा विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दिली. दरम्यान, मालवण मत्स्य कार्यालयातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे बोलले जात होते.