दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या तिघांना मालवणी पोलिसांनी अटक केली. दीपक शिंदे, शाहरुख शेख, मेहबूब शेख अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांकडून दरोडय़ाचे साहित्य हस्तगत केले आहे, तर अंधाराचा फायदा उचलून दोन जण पळून गेले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.
मालवणीच्या खारोडी येथे काही जण दरोडय़ासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी तेथे सध्या वेशात एक पथक तैनात केले. रविवारी पहाटेच्या सुमारास तीन जण खारोडी येथील एका एटीएम सेंटर येथे येताना दिसले. त्यानंतर आणखी दोन जण तेथे आले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले, मात्र ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले, तर दोन जण हे पळून गेले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मेहबूब हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तो दरोडा टाकण्यासाठी त्याच्या सहकाऱयासोबत आला होता.



























































