
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मालदा जिल्ह्यातील गाझोल येथे झालेल्या एसआयआर विरोधी मेळाव्यात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राज्याला मिळायला हवा असलेला निधी केंद्र देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. जीएसटीनंतर आता सिगारेटवरील करही केंद्राकडे ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी सध्याची परिस्थिती ‘आणिबाणीतल्या काळासारखी’ असल्याचे म्हटले.
गाझोलमधील सभेत ममता बॅनर्जी म्हणाल्या, येथे रेल्वेची लाईन पूर्ण करण्यात आली असून पूर्वी नियमित येणाऱ्या पुराच्या समस्यादेखील मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. “मी इथे मत मागायला आलेली नाही, तुमची चिंता कमी करण्यासाठी आले आहे. घाबरू नका,” असे त्यांनी नागरिकांना आश्वस्त करताना सांगितले.
बॅनर्जींनी केंद्रावर निशाणा साधत म्हटले की, राज्यासाठी असलेला निधी मिळत नाही. “जीएसटीनंतर सर्व कर केंद्राकडे गेले. आता सिगारेटवरील करही तेच घेणार असल्याचे कळते. संपूर्ण देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही आणिबाणी सारखी परिस्थिती आहे. पण हे लक्षात ठेवा, सत्ता कायमस्वरूपी कोणाकडेच राहत नाही,” असे त्या म्हणाल्या.
लक्ष्मी भंडार योजनेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, लाभार्थ्यांना हा लाभ पुढेही कायम मिळणार आहे. भविष्यात रक्कम वाढविण्याचा विचारही होऊ शकतो. “100 दिवसांच्या कामासाठी केंद्राने निधी रोखला आहे, पण आम्ही आमच्या मार्गाने काम करत राहणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. वक्फ कायदा केंद्राने आणला असून त्याला राज्याने विरोध केल्याचे त्यांनी सांगितले. “धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंगाली बोलणाऱ्यांना बांगलादेशी म्हणणे योग्य नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
बीएलओंवरील हल्ल्यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, विविध राज्यांतील अनेक बीएलओंचा मृत्यू झाला असून बंगालमध्येही 40 जणांनी जीव गमावला. “निवडणूक प्रक्रियेत एवढी घाई कशासाठी?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नागरिकत्वाशी संबंधित तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊनसारख्या समस्यांबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. “कोणीही बांगलादेशात पाठवले जाणार नाही. आम्ही 12 तारखेपासून ‘मे आय हेल्प यू’ कॅम्प सुरू करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
शेवटी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, धर्माच्या नावावर भडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. “तुमच्यासाठी मी आहे, जे बोलते ते करते. आमच्याविरोधात सोशल मीडियावर एआय वापरून खोटी व्हिडिओ बनवले जात आहेत. त्यांना बळी पडू नका,” असे त्यांनी सांगितले.


























































