
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) या मुद्दय़ांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांच्याही वक्तव्यांमध्ये विसंगती आहे, असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपवर चांगल्याच बरसल्या. मोदी सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या की, एकीकडे अमित शहा एनआरसी पूर्ण देशात लागू होणार असे म्हणत आहेत, तर पंतप्रधान मोदी एनआरसी केवळ आसाममध्येच लागू केला जाणार असल्याचे सांगत आहेत. सीएए आणि एनआरसीच्या विरोधातील लढाई ही देशाच्या एकात्मतेची लढाई आहे. कारण भाजप हिंदुस्थानचे विभाजन करू पाहत आहे, असेही ममता यांनी एनआरसीविरोधातील रॅलीमध्ये बोलताना सांगितले.
येडियुरप्पांसमोरही जोरदार निदर्शने
कर्नाटक – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा मंगळवारी सकाळी कन्नूर येथे जाण्यासाठी विमानतळावर आले तेव्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. येडियुरप्पा यांचा ताफा विमानतळावर येताच पार्किंग भागात आधीच दबा धरून बसलेल्या तिघा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘परत जा’ अशा जोरदार घोषणा दिल्या. या तिघांनाही पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आणि तेथून बाहेर काढले. मंगळवारी त्यांनी राजराजेश्वरा मंदिरालाही भेट दिली. मुख्यमंत्र्यांसमोर काळे झेंडे दाखवणाऱया युवक काँग्रेसच्या किमान 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.
मालमत्ता नुकसानीच्या वसुलीसाठी याचिका
नवी दिल्ली – सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करताना राजधानी दिल्लीत सार्वजनिक कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीच्या वसुलीची मागणी करणारी याचिका भाजप नेत्या ऍड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मंगळवारी केली. मात्र या प्रकरणाची तत्काळ सुनावणी करण्यास कोर्टाने नकार दिला.
मंगळुरू दगडफेकीचा व्हिडीओ जारी
बंगळुरू – सुधारित नागरिकत्व कायद्यावरून मंगळुरू येथे गेल्या गुरुवारी विरोध प्रदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा व्हिडीओच पोलिसांनी मंगळवारी जारी केला. यात आंदोलक गाडय़ांमध्ये दगड भरभरून आणताना आणि पोलिसांवर दगडफेक करताना तसेच सीसीटीव्ही कॅमेऱयांची नासधूस करताना दिसत आहेत. आपली ओळख लपविण्यासाठी आंदोलकांनी आपले चेहरे लपवले होते. पोलिसांच्या गोळीबारात मरण पावलेले आंदोलक निर्दोष होते, हिंसाचाराशी त्यांचा काहीच संबंध नव्हता असा दावा येथील काँग्रेस आणि जद (एस) पक्षांनी केला होता, तर सिद्धरामय्या आणि एच. डी. कुमारस्वामी या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या घरी जाऊन त्यांच्या नातलगांना पाच लाखांचा चेक दिला होता, मात्र पोलिसांनी जारी केलेल्या व्हिडीओमुळे हे आंदोलक निर्दोष असल्याचा दोन्ही पक्षांचा दावा फोल ठरला आहे. दरम्यान, गृहमंत्री बसावराज बोम्मई यांनी हिंसाचाराच्या वेळी संयम राखल्याबद्दल पोलिसांची तारीफ केली.
गोवा भाजपतर्फे 3 जानेवारीला मेगारॅली
पणजी – सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी गोव्यातील भाजपने पणजीत 3 जानेवारी रोजी मेगारॅली आयोजित केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजीतील भाजप आमदारांची बैठक घेऊन देशातील सीएएविरोधी आंदोलनाबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर भाजप आमदार ग्लेन टिक्लो यांनी पणजीत ही मेगारॅली आयोजित केल्याचे सांगितले.





















































