
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) विरोधात एक मोठे विधान केले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, एसआयआरच्या नावाखाली माता आणि बहिणींचे हक्क हिसकावून घेण्याची तयारी सुरू आहे. महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी लढावे. महिलांनी त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी स्वयंपाकघरातील भांडी वापरावीत. जर महिला आघाडीवरून लढल्या तर पुरुषही मागे उभे राहतील. नादिया येथील कृष्णानगर येथे एका सभेला संबोधित त्या असे म्हणाल्या आहेत.
ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, “तुमच्याकडे शक्ती आहे ना? जर तुमची नावे वगळली गेली तर तुम्ही ती सहन करणार का? निवडणुकीच्या वेळी ते दिल्लीहून पोलिसांना आणतील आणि तुमच्यावर दबाव आणतील. पण घाबरू नका. तुमच्याकडे स्वयंपाकघरातील साहित्य आहे. त्यांच्यासोबत तयार राहा. तुम्ही आघाडीवर लढाल. पुरुषही तुमच्या मागे असतील.”
ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपशी संबंधित अधिकाऱ्यांना तैनात करत आहे. पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीहून काही भाजप समर्थित व्यक्तींना पाठवले जात होते. ते एसआयआर सुनावणीदरम्यान जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवून होते.

























































