
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीने विद्यमान आमदार सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे. ममता बॅनर्जी यांना या मतदारसंघात कोण आव्हान देणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते. आज भाजपने सुवेंदू यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी भाजपा महासचिव अरुण सिंह यांनी पक्षाच्या मुख्यालयात आज 57 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली.
माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी भाजपमध्ये
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धाच्या अखेरच्या दिवशी सभागृहातच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणारे तृणमूल नेते दिनेश त्रिवेदी यांनी शनिवारी अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत त्रिवेदी यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. 2012 मध्ये ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या कोटय़ातून त्रिवेदी यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी दिली होती.