
ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना खटाव तालुक्यातील म्हासुर्णे शिवारात घडली असून, आरोपीला वडूज पोलिसांनी अटक केली आहे. गजानन अनंता खैरे (रा. कल्याण, ता. मेहकर, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे.
बीड जिह्यातून एक कुटुंब पडळ व गोपुज या कारखान्याची ऊसतोड करण्यासाठी आले होते. ते म्हासुर्णे येथे खैर ओढा नावाच्या शिवारात कोपी टाकून राहत होते. आरोपी खैरे हा त्यांच्याशेजारी राहात होता. सोमवारी कारखाना बंद झाल्याने पीडित कुटुंब गावाकडे जाण्यासाठी आवराआवर करीत होते. दुपारी मुलीचे वडील कामानिमित्ताने गावात गेले असता आरोपी खैरे हा मोबाईल दाखवतो म्हणत अल्पवयीन मुलीला बाहेर घेऊन गेला.
मुलीचे वडील घरी आल्यावर मुलगी कुठे आहे, हे पाहण्यासाठी गेले असता जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली मुलगी जखमी अवस्थेत दिसून आली. त्यानंतर मुलीला याबाबत विचारले असता, मुलीने गजानन खैरे याने अत्याचार केल्याचे सांगितले. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, उपनिरीक्षक प्रवीण दीक्षित यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीला ताब्यात घेतले. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख तपास करीत आहेत.


























































