महिलेवर अश्लील कमेंट करणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन गेम खेळत असताना झालेल्या वादातून महिलेला अश्लील कमेंट करणाऱयाला अखेर सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. रोहित सिंग असे त्याचे नाव आहे. त्याने महिलेला अश्लील कमेंट करून सोशल मीडियावर ती स्टोरी अपलोड केली.

तक्रारदार या महिलेची जून महिन्यात ऑनलाईन गेम खेळताना एका ग्रुपशी वाद झाला. तो वाद प्रचंड टोकाला पोहोचला. महिलेला धडा शिकवण्यासाठी रोहितने महिलेला ग्रुपवर अश्लील कमेंट केली. तसेच ती अश्लील कमेंट त्याने इंस्टाग्रामला स्टोरी म्हणून ठेवत महिलेला टॅग केली. हा प्रकार लक्षात येताच महिलेने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

सहाय्यक पोलीस आयुक्त महेश मुगुटराव यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक उन्मेष थिटे यांच्या पथकातील उपनिरीक्षक बरस्कर, शार्दूलकर, हिरेमठ आदींच्या पथकाने तपास करून पंजाब पोलिसांच्या मदतीने रोहितला ताब्यात घेतले.