लग्नाचे आमिष दाखवून तरुणींची, तर स्वस्तात आयफोनच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजमाध्यम तसेच मॅट्रीमोनियल साइटवर भावी साथीदाराचा शोध घेणाऱया तरुणींना आर्थिक चुना लावणाऱया भामटय़ाच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. विशाल चव्हाण उर्फ अनुराग (34) असे त्याचे नाव असून त्याने आतापर्यंत 35 ते 40 तरुणींच्या भावनांशी खेळून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच त्याने अनेक तरुणांनादेखील चुना लावला आहे.

आश्लेषा (28, नाव बदललेले) या तरुणीने कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात विशालविरोधात तक्रार दिली होती. विशालने मॅट्रोमोनियल वेबसाईटवरून आश्लेषाशी संपर्क साधला. श्रीमंत असल्याचे सांगत त्याने आश्लेषाला लग्नाची विचारणा केली. आश्लेषाने पण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मग त्यानंतर आपल्या भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करायची बतावणी करत त्याने आश्लेषाला पैसे गुंतविण्याच्या बहाण्याने अभ्युदय बँकेत सवा दोन लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार आश्लेषाने पैसे भरल्यानंतर विशालने तिच्याशी संपर्क करायचे बंद केले. गंभीर म्हणजे कधीही न भेटता विशालने आश्लेषाची फसवणूक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर युनिट-7 च्या प्रभारी निरीक्षक प्रिया थोरात, निरीक्षक सुधीर जाधव, एपीआय अमोघसिद्ध ओलेकर, उपनिरीक्षक रामदास कदम व पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीने वापरलेले मोबाईल, सोशल साइट तसेच मॅट्रोमोनियल साइटवर खोटा पत्ता तसेच मोबाईल नंबर दिला होता. फोटोदेखील भलत्याचाच अपलोड केला होता. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे कठीण बनले होते. असे असतानाही तांत्रिक बाबी व खबऱयांच्या जोरावर पथकाने विशाल चव्हाण या भामटय़ाला कल्याण येथे पकडले.

कल्याण पूर्वेकडील श्रद्धा महल या इमारतीत लपल्याचे समजताच पोलीस तेथे धडकले. तेव्हा तो एका फ्लॅटमध्ये लपला होता. त्यामुळे पोलिसांनी एकाला डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगत त्या रूमवर पाठवले आणि विशालने दरवाजा उघडताच त्याच्यावर झडप घातली. विशाल जवळपास 35 ते 40 तरुणींना कधीही न भेटता केवळ सोशल मीडिया व फोनच्या माध्यमातून गंडा घालत होता. प्रत्येक तरुणीकडून त्याने शेअर मार्पेटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने लाखो रुपये उकळले आहे. काही तरुणींसोबत शारीरिक संबंध देखील ठेवले. त्याच्याविरोधात शीव, वर्सोवा, नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

कमी किमतीत लेटेस्ट आयफोन

तरुणींबरोबरच विशालने 25 ते 30 तरुणांचीदेखील फसवणूक केली आहे. सोशल मीडियावर त्याने तो अॅपल कंपनीत मोठय़ा पदावर कार्यरत असल्याचा प्रोफाइल ठेवला. मग त्याआधारे तरुणांशी संपर्क साधून कमी किमतीत लेटेस्ट आयफोन देतो असे सांगत त्याने 25 ते 30 तरुणांची 20 ते 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे देखील उघडकीस समोर आले आहे.