
राजस्थानातील उदयपूरमधील कन्हैयालाल यांच्या निर्घृण हत्येच्या व्हिडिओचे कौतुक करणाऱ्या एका व्यक्तीला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. आसिफ खान असे 23 वर्षीय आरोपीचे नाव असून तो नोएडा सेक्टर 168 जवळील छपरौली गावात राहतो. तो वडिलांच्या दुकानात वेल्डरचे काम करतो. 28 जून रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालाल या टेलरची दोन मुस्लिम तरुणांनी चाकूने हल्ला करत निर्घृण हत्या केली. या हत्येचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हायरल व्हिडिओवर आरोपी आसिफ याने ‘बरं झालं’ अशी कमेंट केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 505(2)/295अ अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार एका न्यूज पोर्टलने उदयपूर घटनेचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला होता. असिफने हा व्हिडिओ लाइक केला आणि कमेंट केली की, ‘बरं झालं, खूप छान केले भाई’. ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर पोलीस अधिकार्यांनी रहिवाशांना शांतता राखण्याचे आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशा प्रक्षोभक पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत असे आवाहन केले आहे. विविध धर्मगुरूंमार्फतही हा संदेश दिला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस म्हणाले की उदयपूरच्या घटनेनंतर आम्ही सतर्क झालो आहोत आणि सर्व खबरदारी घेत आहोत. विविध समुदायातील रहिवासी आणि धार्मिक नेत्यांना आम्ही सहकार्य करण्यास सांगत आहोत. आम्ही रहिवाशांना शांतता बिघडवणाऱ्या कोणत्याही घटनेची तक्रार करण्यास सांगितले आहे.

























































