पुण्यात परिक्षेत प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी ब्लूटूथचा वापर करणाऱ्या मुन्नाभाईला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या गट क सेवा मुख्य परिक्षेत ब्लूटूथचा वापर करून प्रश्नपत्रिका सोडविणाऱ्या मुन्नाभाईला पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाइल आणि ब्लूटूथ जप्त करण्यात आले असून त्याला मदत करणारा साथीदार फरार झाला आहे. ही घटना 6 ऑगस्टला सिंहगड कॉलेज ऑफ आटर्स अ‍ॅण्ड कॉमर्समध्ये घडली. केवलसिंग चेनसिंग गुशिंगे (वय 30 रा. होनोबाची वाडी, गेवराई पैठण, संभाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संतोष ताम्हाणे (वय 45 रा. धायरी) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 6 ऑगस्टला गट क सेवा मुख्य परिक्षा घेण्यात येत होती. त्यावेळी नऱ्हे परिक्षा केंद्रात केवलसिंग परिक्षा देत असताना पर्यवेक्षकाला हालचाल दिसून आली. संशय आल्यामुळे पर्यवेक्षकांनी त्याची तपासणी केली असता, केवलसिंग ब्लूटूथद्वारे प्रश्नपत्रिका सोडवत असल्याचे लक्षात आहे. त्यानुसार त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी त्याला मदत करणाऱ्या साथीदाराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहूल यादव तपास करीत आहेत.