
तरुणीने अंकल म्हटल्याने संतापलेल्या दुकानदाराने एका तरुणीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तराखंडमधील उधमसिंह नगर परिसरात घडला आहे. या तरुणीला तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
आरोपीचे जनपद सितारगंज येथे खेळाच्या वस्तूंचे दुकान आहे. त्या दुकानातून पीडित तरुणी बॅडमिंटन घेऊन गेली होती. मात्र काही कारणास्तव बुधवारी ती ते बॅडमिंटन बदलायला आली होती. त्यावेळी तिने दुकानदाराला अंकल म्हटले ते ऐकून तो दुकानदार भडकला व त्याने मुलीच्या चार पाच कानाखाली मारल्या. त्यानंतर ती बदलायला आलेल्या बॅडमिंटननेच त्याने तिला मारहाण केली.
या मारहाणीत सदर तरुणी गंभीर जखमी झाली. शेजारच्या दुकानदारांनी मध्यस्थी करून तरुणीला त्या दुकानदाराच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर ते तिला घेऊन तिच्या घरी गेले. घरच्यांनी मुलीची परिस्थिती पाहता तिला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. मुलीला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तिला ऑक्सिजन लावण्यात आला असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली असून घटनेपासून दुकानदार फरार झाला आहे.




























































