
एका 22 वर्षांच्या तरुणाने सेल्फी विकून कोट्यवधी रुपये कमावल्याची घटना घडली आहे. आता मात्र त्याला एका वेगळ्याच भीतीने घेरलं असून ती भीती खरी ठरू नये, अशी प्रार्थना तो तरुण करत आहे.
या तरुणाचं नाव सुल्तान गुस्ताफ अल घोजालिक असं आहे. सुल्तान हा कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. त्याला रोज कॉम्प्युटरसमोर बसून स्वतःचा फोटो काढायची सवय आहे. गेली पाच वर्षं तो हे फोटो काढत होता. या फोटोंचा संग्रह करून त्याने एक टाइम-लॅप्स म्हणजे कालप्रवाही पद्धतीचा व्हिडीओ बनवला. त्याने आपल्या 933 सेल्फींना एनएफटी अर्थात नॉन फंजीबल टोकन या प्रणालीच्या माध्यमातून विकण्याचा निर्णय घेतला.
एनएफटी ही एक अशी यंत्रणा असते, ज्या माध्यमातून एखादा त्याच्याकडील खासगी गोष्टी सार्वजनिक करून त्याद्वारे पैसे कमवू शकतो. या प्रणालीवर आपल्याकडील गोष्ट उदा. एखादा दुर्मीळ किंवा अनोखा फोटो, व्हिडीओ अपलोड करता येते. त्यावर आपण आपल्या या गोष्टीची विक्रीसाठी किंमतही ठरवू शकतो. त्याचाच वापर करून सुल्तानने त्याचा व्हिडीओ एनएफटीवर अपलोड केला होता.
त्याला अर्थातच अजिबात अपेक्षा नव्हती की त्याच्या सेल्फीमध्ये कुणाला स्वारस्य असू शकेल. त्यामुळे आपला हा टाइम लीप्स व्हिडीओ त्याने फक्त 3 डॉलर इतक्या किमतीलाच एनएफटीवर नोंदवला होता. पण, एका सेलिब्रिटी शेफला त्याचा फोटो आवडला आणि तो त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटला शेअर केला. यानंतर सुल्तानच्या लोकप्रियतेत वाढ होऊ लागली.
त्याचे सेल्फी हातोहात विकू लागले. त्याचा चेहरा गाण्यात, टी शर्ट किंवा मगवर प्रिंट करून लोक वापरू लागले. त्याचा फायदा असा झाला की त्याच्या या सेल्फी व्हिडीओची विक्री वाढल्याने एनएफटीवर चांगला दर मिळू लागला. त्याचे अनेक सेल्फी चांगल्या किंमतीला विकले गेल्याने त्याला कोट्यवधींचा फायदा झाला.
आता मात्र सुल्तानला एक वेगळीच भीती सतावत आहे. त्याच्या व्हिडीओ आणि फोटोंचा वापर करून कुणी गैरप्रकार करणार नाही किंवा अश्लील सामग्रीत त्याचा फोटो मॉर्फ करून वापरण्यात तर येणार नाही ना, अशी शंका त्याला भेडसावत आहे.





























































