सोशल मीडियातून धार्मिक भावना दुखावल्या, एकाला अटक

1249

सोशल मीडियातून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला एका व्यक्तीविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस रविवारी पोखरी (ता.आष्टी, जि. बीड) येथून अटक केली आहे. एकनाथ राजाराम शिंदे असे आरोपीचे नाव आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यातील पोखरी येथील रहिवासी असलेल्या एकनाथ राजाराम शिंदे याने व्हॉटसअॅपवरील एका ग्रुपवर एका विशिष्ट धर्माच्या लोकांकडून भाजीपाला व कसलाही माल विकत घेऊ नका, तुम्ही तुमचा मृत्यू विकत घेत आहात, लक्षात ठेवा, अशा आशयाची पोस्ट टाकली होती. तसेच फळ विक्रीचा व्यवसाय करणारे एका विशिष्ट धर्माचे दोन युवक हातगाडीवर फळे लावताना त्यातील एक इसम हा प्रत्येक फळ लावण्याच्या अगोदर बोटास थुंकी लावत असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला होता. ही बाब याच ग्रुपमधील सदस्य असलेल्या जामखेड तालुक्यातील लोणी येथील अन्सार नवाब पठाण (वय 28) या युवकाच्या निदर्शनास आली. पठाण याने हा प्रकार तातडीने जामखेड पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. जामखेड पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली, व सोशल मीडियातून दोन समाजात तेढ निर्माण करण्याबरोबरच सरकारने कोविड19 संदर्भात खोट्या अफवा पसरू नयेत, असे आदेश दिलेले असताना देखील त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकनाथ राजाराम शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या पथकाने वेगवान तपास करीत या प्रकरणातील आरोपीला पोखरी येथून अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या