
पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिनवर काळ्या जादूचा आरोप करत एका तरुणाने त्यांच्या घरामध्ये जबरदस्ती प्रवेश केला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला अटक केली. तेजस झानी असे या तरुणाचे नाव असून तो गुजरातमधील सुरेंद्र नगर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
आरोपी तरुण गुजरातहून ट्रेनने प्रवास करत दिल्लीला पोहोचला. तिथून त्याने उत्तर प्रदेशमधील रबुपुरा येथे पोहोचण्यासाठी विविध साधनांचा वापर केला. रबुपुराला पोहोचताच त्याने सीमा हैदर आणि सचिनचे घर गाठत जबरदस्ती घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. गोंधळ ऐकूण सीमाने दार उघडल्यावर आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. सीमाने प्रतिकार केल्यावर आरोपीने तिला मारहाण केली.
हा गोंधळ एकूण सीमाच्या कुटुंबातील इतर सदस्य आणि आजूबाजूचे लोक तिच्या मदतीला धावले. त्यांनी आरोपी तरुणाला पकडले आणि त्याला बेदम चोप देत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. सध्या त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती एसीपी सार्थक सेंगर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये असे समोर आले आहे की, आरोपी तेजस झानी हा मानसिक रुग्ण आहे. पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबाशी संपर्क साधला आहे. तसेच चौकशी दरम्यान आरोपी तेजसने सीमा हैदर आणि सचिनने आपल्यावर काळी जादू केल्याचा आरोप केला.
सीमा आणि सचिनने माझ्या फोटोवर काळी जादू केली. काळ्या जादूमुळे सीमावर माझे प्रेम जडले आणि त्यामुळे बाराशे किलोमीटर प्रवास करून रबुपुरा येथे पोहोचलो. सीमाच्या प्रेमात आपले मानसिक संतुलन ढासळल्याचा दावाही आरोपीने केला. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर सीमा हैदरच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
कोण आहे सीमा हैदर?
सीमा हैदर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवासी आहे. पब्जीवरून सचिन मिणाशी तिचे सूत जुळले आणि मे 2023 मध्ये पतीला सोडून चार मुलांसह नेपाळमार्गे अवैधरित्या हिंदुस्थानात आली. जुलै 2023 मध्ये सीमा आणि सचिनला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर दोघांना जामिनावर सोडण्यात आले. सीमाने हिंदू धर्मही स्वीकारला असून दोघांनी लग्नही केले आहे. मार्च महिन्यात सीमाने सचिनच्या मुलीलाही जन्म दिला. आता पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान -पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असताना सीमालाही पाकिस्तानला पाठवण्याची मागणी होत आहे.