रागाच्या भरात पतीने चावले पत्नीचे नाक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । शाहजहांपूर

उत्तर प्रदेशात शाहजहांपूर जिल्ह्यात एका तरुणाने रागाच्या भरात आपल्या पत्नीच्या नाकाचा चावा घेऊन तिला गंभीर जखमी केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून त्यांच्यात वाद झाला. आपण रागात रागाच्या भरात कृत्य केल्याची कबूली पतीने पोलिसांना दिली आहे.

शाहजहांपूरमधील पल्होरा गावात राहणारी ३२ वर्षांची महिला पाच दिवसांपुर्वी माहेरी जाते असे सांगून घरातून निघाली. मात्र, ती माहेरी न जाता बरेलीला गेली. त्यानंतर शुक्रवारी घरी परतल्यानंतर कुठे गेली होती असा जाब पतीने विचारल्यावर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांना समजावून त्यांच्यात समेट घडवून आणण्यात आला. त्यानंतर त्यांचा संसार पुन्हा रुळावर आला. मात्र, रविवारी बाहेर जात असल्याचे सांगत महिला घराबाहेर पडली. तेव्हा पतीने तिला कुठे जात आहे असे विचारले. त्यानंतर परत त्यांच्यात वादावादी झाली. या वादात रागाच्या भरात पतीने पत्नीच्या नाकाचा चावा घेतला. त्यात ती गंभीर जखमी झाली. पत्नी नेहमी बाहेर जात असल्याने तसेच कुठे जाते ते सांगत नसल्याने तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. हा राग मनात ठेवून त्याने तिच्या नाकाचा जोरदार चावा घेतला. घटनेनंतर पोलिसांनी पतीला अटक करून महिलेला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे.