वीजेच्या धक्क्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नेवासा

नेवासा तालुक्यातील बेलपांढरी फाट्यावर वीजेच्या खांबावर काम करित असतांना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने कंत्राटी कामगार वीजेच्या धक्क्याने जागीच गतप्राण झाला. रविवारी दुपारी हा प्रकार झाला. महावितरणच्या या गलथान कारभारामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

तालुक्यातील बहिरवाडी येथील राजेंद्र घोरपडे टेलर यांचा वायरमन मुलगा नितीन राजेंद्र घोरपडे (24) हा रविवारी दुपारी 12 वा. मेनलाईन वर काम करत होता. त्यावेळी अचानक विद्युतप्रवाह सुरू झाल्याने त्याला जबरदस्त वीजेचा धक्का बसला व तो वीजेच्या खांबाला चिकटला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (13) रोजी सायंकाळी झालेल्या वादळात महावितरणची विद्युत सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली होती.म्हणून रविवारी सकाळी 11 वा. दरम्यान बेलपांढरी फाटा येथे लाईटचा झालेला तांत्रिक बिघाड दुरुस् करण्यासाठी नितीन घोरपडे वीजेच्या खांबावर चढला होता. त्यावेळी त्याला विजेचा जबर धक्का बसल्याने तो जागीच ठार झाला. नितीन जवळपास दोन ते तीन तास विद्युत खांबावर तसाच लटकलेल्या अवस्थेत होता.

याबाबत वीज वितरण कंपनीला कळवले तरीही महावितरणचे वरिष्ठ कोणतेही अधिकारी तिकडे फिरकलेच नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढतच होता संतप्त झालेल्या लोकांनी मृतदेह वीज वितरण कंपनी च्या 132 के व्ही च्या कार्यालया समोर आणून ठेवला .काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मेनलाईनचे काम सुरू असताना विद्युत प्रभाव कसा सुरू झाला ? याला जबाबदार कोण ? संबंधितांवर गुन्हा दाखल करावा यासाठी मृतदेह नातेवाईकांनी नेवासा सब स्टेशनवर ठेवत काही वेळ ठिय्या आंदोलन केले. उपविभागीय पोलीस अधीकारी मंदार जवळे यांनी मध्यस्थी करत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर व दोषींवर कारवाई, तसेच शासकीय नियमानुसार मदतीचे लेखी आश्वासन दिले.