केमिकल खरेदीच्या नावाखाली फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या लष्करातून बोलत असल्याचे भासवत केमिकल खरेदीच्या नावाखाली ठगाने कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार हे लोअर परळ येथे एका खासगी कंपनीत काम करतात. गेल्या महिन्यात तक्रारदार हे कार्यालयात होते. तेव्हा त्याच्या कार्यालयातील एकाला एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने तो हिंदुस्थानच्या लष्करातून बोलत असल्याचे भासवले. लष्कराचे कार्यालय कलिना मिलिटरी कॅम्प येथे आहे, असे सांगण्यात आले. ठगाने त्यांना पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱया केमिकल खरेदीबाबत चर्चा केली. चर्चेनंतर त्यांना ई-मेलवर केमिकलचे कोटेशन पाठवले.

तसेच तक्रारदार याने कंपनीचे जीएसटी प्रमाणपत्र, पॅनकार्ड, आदी प्रमाणपत्रे व्हाट्सअॅपवर पाठवली. ठगाने तक्रारदार यांना एक जीएसटी नंबर पाठवला. त्या नंबरची तपासणी केली. ठगाने कंपनीच्या संचालकांना बँक खात्याची पडताळणी करायचे असल्याचे भासवले. त्यासाठी एका नंबरवर त्याना संपर्क करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने फोन केला. ठगाने चाचणी शुल्क म्हणून पाच रुपये एका खात्यात भरण्यास सांगितले. पैसे भरल्यानंतर कंपनीच्या खात्यात 10 रुपये आले. त्यानंतर ठगाने एका खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले. लष्कराची कार्यपद्धत असून त्या पैशाचा पुन्हा परतावा मिळेल अशा भूलथापा मारल्या. त्यावर विश्वास ठेवून पैसे पाठवण्यास होकार दिला. पैसे पाठवण्यास होकार दिल्यावर काही त्रुटी असल्याचे ठगाने त्यांना सांगितले. त्यानंतर आणखी दोन खात्यांत त्याने पैसे पाठवले. पैसे खात्यात जमा झाले नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे संचालकाने त्या दोन नंबरवर संपर्क केला. ते दोन्ही नंबर बंद होते. 20 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक झाल्या प्रकरणी त्याने मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.