सख्ख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या भावाला जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

स्वतःच्या सख्ख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या भावाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या २० वर्षीय तरुणाने त्याच्या बहिणीवर २०१४मध्ये वारंवार बलात्कार केला होता. या प्रकरणी दाखल झालेल्या खटल्याचा निर्णय न्यायालयाने गुरुवारी दिला.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाने पीडित मुलीवर १८ मार्च २०१४ रोजी पहिल्यांदा बलात्कार केला. पीडितेचे उर्वरित कुटुंब उत्तर प्रदेशचे रहिवासी असून पीडिता आपला भाऊ आणि एका बहिणीसोबत मुंबईत वडाळा येथे राहते. २०१४मध्ये जेव्हा तिच्या भावाने तिच्यावर अत्याचार केले तेव्हा पीडिता अल्पवयीन होती. या भयंकर घटनेनंतर तिच्या भावाचे अत्याचार थांबले नाहीत. उलट त्यानंतर वारंवार तो तिच्यावर बलात्कार करत होता. या घटनेची वाच्यता तिने कुठेही करू नये, म्हणून तो तिला मारहाणही करत असे.

या सततच्या लैंगिक अत्याचारांमुळे बिथरलेल्या पीडितेने याबद्दल तिच्या शाळेत येणाऱ्या समाजसेविकेला सांगितले. त्यानंतर त्या समाजसेविकेने पीडितेला धीर देत पोलिसात तक्रार दाखल केली. सुमारे चार वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजयश्री घरत यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पार पडली. या सुनावणीअंती दोषी ठरलेल्या या तरुणाला पोक्सो कायद्यांतर्गत बलात्कार, मारहाण अशा गुन्ह्यांसाठी रुपये ३२ हजार इतका दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.