
सामना ऑनलाईन । नागपूर
नागपूरमध्ये ग्रामीण पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे एका पतीची तुरुंगात विनाकारण रवानगी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. रामटेक पोलिसांच्या हद्दीतील हा प्रकार उघडकीस आला असून दीपक सोमकवार (३५) असं पतीचं नाव आहे. दिपकवर त्याची पत्नी शिल्पा हिच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ऑक्टोबर २०१७ मध्ये शिल्पाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दीपकला अटक केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर दीपक आणि शिल्पामध्ये सतत वादविवाद होत होते. सतत होणाऱ्या भांडणांमुळे शिल्पा घर सोडून निघून गेली होती. त्या दरम्यान, ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात पोलिसांना सातरापूरच्या बोंदरी या गावात मुंडके नसलेले धड आढळले. त्या मृतदेहाच्या जवळच शिल्पाचा मोबाईल सापडला होता. दीपक आणि शिल्पामध्ये होणाऱ्या सततच्या भांडणामुळे दीपकने शिल्पाचा खून केल्याच्या संशयातून पोलिसांनी दिपकला अटक केली.
प्रत्यक्षात मात्र शिल्पा तिच्या नातेवाईकांच्या घरी राहायला गेली होती. ती परत आल्यावर पोलिसांनी दीपकवर लावले सर्व गुन्हे रद्द केले. मंगळवारी विधानसभेत नागपूर ग्रामीण पोलिसांच्या या हलगर्जीपणाविषयी काँग्रेस कार्यकर्ते उदयसिंह यादव यांनी माहिती दिली. पोलिसांनी दीपककडून जबरदस्तीने शिल्पाचा खून केल्याचं वदवून घेतल्याचा आरोप यादव यांनी केला. दीपकवर अन्याय झाल्यास सरकारने दीपक आणि त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, असंही यादव यावेळी म्हणाले.


























































