
प्रेयसीला जबरदस्तीने घेऊन जाणाऱ्या प्रियकराने विरोध करणाऱ्या तिच्या वडिलांची हत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या बरेली येथी घडली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीपाल असं या तरुणाचं नाव आहे. तो आनंदपूरचा रहिवासी आहे. त्याचे नरेली रसूलपूर इथल्या रामभरोसे यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. शनिवारी श्रीपाल रामभरोसे यांच्या घरी गेला होता.
त्याने तिथे जाऊन रामभरोसे यांच्यासमोर त्यांच्या मुलीशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे रामभरोसे यांना राग आला. त्यांनी या विवाहाला नकार दिला. पण तो विवाह करण्याविषयी हट्ट करत राहिला.
रामभरोसे यांच्या कुटुंबीयांनीही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. अखेर त्याने आपल्या प्रेयसीला जबरदस्तीने त्याच्या बाईकवर बसवलं. तो बाईक सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना रामभरोसे आणि इतरांनी त्याला अडवायचा प्रयत्न केला.
यावर रामभरोसे आणि श्रीपाल यांचं कडाक्याचं भांडण झालं. रागाच्या भरात श्रीपालने तिथे पडलेला एक दांडुका उचलला आणि तो रामभरोसे यांच्या डोक्यावर मारला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी श्रीपाल याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून श्रीपाल सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध करत आहेत.





























































