
बिहारच्या मुजफ्फरपूर येथे एक भीषण घटना उघडकीला आली आहे. एका विकृताने दोन हजार रुपयांसाठी स्वतःच्या आई-वडिलांची हत्या केली आहे.
या विकृताचं नाव अजय सहनी आहे. ही घटना मुजफ्फरपूर जिल्ह्यातल्या खुटाही गावातील आहे. येथे अजय सहनी हा त्याचे आई-वडील आणि दोन भावांसह राहतो. त्याच्या आईचं नाव शारदा देवी (65) असं असून वडिलांचं नाव शंभू सहनी (70) असं आहे. अजय हा सहनी दांपत्याचा दुसरा मुलगा आहे. अजय हा अविवाहित आहे.
शनिवारी अजय याने दोन हजार रुपये दिले नाहीत म्हणून शंभू आणि शारदा देवी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आधी छोटा सिलींडर त्यांच्या डोक्यात मारला आणि नंतर दोघांचे गळे चिरून त्याने त्यांची हत्या केली. त्यावेळी घरात अजयचा लहान भाऊ संजय याची पत्नीही होती. अजयने तिलाही मारण्याचा प्रयत्न केला. पण, सुदैवाने ती आपला जीव वाचवत घराबाहेर पळाली.
पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच ते घटनास्थळी हजर झाले. त्यांनी अजयला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा मानसिक रुग्ण असून तो त्याच्या कुटुंबासोबत नेहमी भांडण करत असे आणि त्यांना जिवे मारण्याची धमकीही देत असे. त्यामुळे त्याच्यावर रांची येथे इलाज सुरू होता. तो काही दिवसांपूर्वीच घरी परतला होता. मात्र, त्याची वर्तणूक बदलली नव्हती. त्याभरातच त्याने या हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.























































