
उधारीच्या पैशावरून मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणावर कोयत्याने वार करत दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मांजरी खुर्द गावचे हद्दित स्मशानभुमीजवळ घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आह.
विकास लक्ष्मण सोनवणे (वय 32, रा मांजरी खु.ता हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हेमंत मोरे, गोविंद बनसोडे, सोन्या मोरे, शुभम गायकवाड व नाना महाले (सर्व रा.मांजरी खुर्द.ता हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल गायकवाड याने हेमंत मोरे यास दिलेल्या उसन्या पैशावरून झालेल्या भांडणातुन विकास सोनवणे याचा खून करण्यात आला आहे.
फिर्यादी माऊली सोमनाथ मुरकुटे (वय 29, रा.इंदिरानगर, मांजरी खुर्द) यांचे विकास सोनवणे हे नात्याने मामे सासरे असुन ते त्यांचे कुंटुंबासह शेजारीच राहण्यास आहेत. रविवारी रात्री माऊली आणि विकास हे सौरभ साळुके याच्या लग्नाच्या पुजेकरिता माळवाडी आव्हाळवाडी रोड येथे गेले होते. तेथे अमोल गायकवाड याने विकासला फोन करून गावात हेमंत मोरे याच्यासोबत भांडण झाली आहेत. तो माझे उसने घेतलेले पैसे देत नाही त्याला समजवून सांग तू लवकर ये असे म्हणाला.
त्यानंतर ते तेथे गेल्यावर हेमंत मोरे, गोविंद बनसोडे व विकास सोनवणे यांची आपसात शिवीगाळ आणि हाताने हाणामारी सुरु झाली. त्यानंतर गोविंद तेथुन पळुन गेला असता त्याचे पाठीमागे विकास पळत गेला. त्याने हातात दगड उचलले तसेच हेमंत मोरे याने त्याचा पुतन्या सोन्या मोरे याला आवाज देवुन कोयते घेवुन येण्यास सांगितले. त्यानंतर सोन्या दोन कोयते घेऊन आला.
त्याचेकडील एक कोयता हेमंत मोरे याने घेतला तर दुसरा कोयता गोविंद बनसोडे याचेकडे दिला. हेमंत मोरे याने विकास याचे तोंडावर कोयत्याने वार केला, त्यानंतर गोविंद बनसोडे याने देखील विकास यास कोयत्याने मारण्यास सुरुवात केली. तेवढयात सोन्या मोरे याने दगड घेवुन येऊन विकास यास दगडाने मारले. त्यानंतर विकास हा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर विकास मृतावस्थेत आढळला. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

























































