
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ऑनलाईन मीटिंगमध्ये वाढ झाली आहे. यात खासगी बैठकींपासून ते न्यायालयीन सुनावण्यांपर्यंच्या गोष्टींचा समावेश होतो. या दरम्यान एक विचित्र घटना घडली असून त्यामुळे न्यायाधीशही हादरले आहेत.
ही घटना पेरू देशातील आहे. येथील राष्ट्रपती पेड्रो कॅस्टिलो यांच्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर व्हर्चुअल पद्धतीने सुनावणी होत होती. या दरम्यान एक माणूस नग्न होऊन नाचायला लागला. हा माणूस ब्राझिलियन होता आणि मेल स्ट्रीपर असल्याचं दिसून येत होतं. ऑनलाईन सुनावणीदरम्यान तो माणूस नाचत असल्याचा व्हिडीओ व्यत्यय आणत होता.
गंभीर म्हणजे या सगळ्या सुनावणीचं थेट प्रक्षेपण देखील होत होतं. या माणसाचं नाव रिकार्डो मिलोस असं होतं. त्याने नेमक्या कोणाच्या लॉगिन आयडीने त्या सुनावणीत प्रवेश केला होता, ते कळू शकत नव्हतं. काही वेळानंतर त्याने पेड्रो कॅस्टिलोच्या सुरक्षा व्यवस्थेतील एका सदस्याच्या अकाउंटवरून लॉगिन केलं होतं.
गंभीर म्हणजे त्या सदस्याला याची काहीच कल्पना नव्हती असं त्याचं म्हणणं आहे. त्याचा कॉम्प्युटर कुणीतरी हॅक करून हे कृत्य केल्याचा दावा त्याने केला आहे.

























































