
दरवाजात बसण्यावरून झालेल्या वादातून धावत्या एक्स्प्रेसमधून तरुणाला बाहेर फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेसमध्ये कर्जत-भिवपुरी स्थानकादरम्यान ही थरारक घटना घडली आहे. यात विनोद कांबळे (२०, रा. पुणे पानमळा झोपडपट्टी) याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला ठाणे पोलीस ठाण्यात अटक केली आहे.
आरोपी मंगेश दिवेकर (३६) हा भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेसने अकोला-पुणे-मुंबई असा प्रवास करीत होता. त्याचवेळी मृत विनोद कांबळे आणि त्याचा मित्र गणेश दिवेकर हे दोघे हाजीअली दर्शनासाठी मुंबईकडे जात होते. त्याचवेळी दरवाजाजवळ बसण्याच्या वादातून विनोद आणि मंगेश या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका विकोपास गेला की, मंगेश याने थेट लाथ मारून विनोद कांबळेला धावत्या एक्स्प्रेसमधून बाहेर ढकलले. गंभीर अवस्थेत विनोदला तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवत कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांनी आरोपीला ठाणे स्थानकावरून ताब्यात घेतले.