
कोल्हापुरात हरिनामाचा जप करताना एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आला. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतरही ही व्यक्ती जिवंत झाली.
वारकरी संप्रदायातील 65 वर्षीय पांडुरंग रामा उलपे हे पत्नी बाळाबाई यांच्यासह कसबा बावडामधील उलपे मळ्यात राहतात. दरवर्षी न चुकता पंढरपूरची वारी करणारे पांडू तात्या नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी घरीच अखंड हरिनामाचा जप करत बसले होते.पण अचानक अस्वस्थ वाटून अंगाला दरदरून घाम फुटला. काही क्षणातच तात्या बसल्या ठिकाणी कोसळल्याचे पत्नी बाळाबाई यांच्या लक्षात आले. त्यांची आरडा ओरड ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि उलपे यांना गंगावेश येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच रात्री साडे अकराच्या दरम्यान पांडू तात्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
तात्या गेल्याचा निरोप आल्यानंतर शोकमग्न नातेवाईक घरी येऊ लागले. अंत्यसंस्काराची तयारीही सुरू झाली. वारकरी संप्रदायातील तात्यांचे सहकारीही एकत्र येऊ लागले होते. तर ॲम्बुलन्समधून तात्यांचा मृतदेह घरी आणताना वाटेत रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात ॲम्बुलन्सचे चाक गेले. या धक्क्याने पांडू तात्यांच्या शरीरात मात्र हालचाल झाल्याचे सोबतच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. मग त्यांनीही तत्काळ ॲम्ब्युलन्स कसबा बावड्यातील डी.व्हाय.पाटील हॉस्पिटलकडे वळवली. यावेळी डॉक्टरांनी केलेले प्रयत्न आणि पांडू तात्यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर पांडू तात्यांनी मृत्यूवरही विजय मिळवला. दोन दिवसात हळूहळू पांडू तात्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
फुलांच्या पायघड्याने स्वागत
बुधवारी सकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर फुलांच्या पायघड्या घालून वारकरी पांडुरंग उलपे यांचे वारकरी संप्रदायातील सहकाऱ्यांनी घरी स्वागत केले. महिलांकडून औक्षण करण्यात आले. तसेच त्यांना दीर्घ आयुष्य मिळावे अशी प्रार्थना पांडुरंग चरणी करण्यात आली.
पुन्हा तात्या अस्वस्थ
तात्यांना जणू काही पुनर्जन्मच मिळाल्याच्या वृत्ताने जिल्हाभर चर्चेचा विषय सुरू झाला. घरी प्रकृतीची विचारपूस करायला येणाऱ्या नातेवाईकापासून ते प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दाखल होऊ लागल्याने, या झालेल्या प्रकारापासून अनभिज्ञ असलेल्या तात्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याचे दिसून येऊ लागले.
































































