
आंबेगाव तालुक्यातील नागापुर येथील दोन शेतकऱ्यांच्या कांदा बराकीत अज्ञाताने युरिया टाकून सुमारे 750 कांद्याच्या पिशवीचे नुकसान केले आहे. ही घटना आज बुधवारी (दि .28) उघडकीस आली. या घटनेत पंढरीनाथ शिंदे व बाळासाहेब शिंदे या दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .
मागील काही महिन्यापासून शेतीमालाला बाजार भाव योग्य मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजारात न विकता पुढील काळात चांगला बाजार भाव मिळेल या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला होता, नागापुर येथील श्री क्षेत्र थापलींग देवस्थानचे पुजारी पंढरीनाथ सोपान शिंदे यांच्या घराशेजारीच त्यांनी बराकीत 250 पिशवी कांदा व तेथून जवळच राहणारे बाळासाहेब मारूती शिंदे यांच्या बराकीत 500 पिशवी कांदा साठवला होता. कांद्याला चांगला बाजार भाव मिळेल या आशेने साठवलेल्या कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकला. त्यामध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले. बाळासाहेब शिंदे बराकीशेजारीच शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना बराकीच्या शेजारी युरिया पडलेला दिसून आला. शिंदे यांना शंका आल्याने पंढरीनाथ शिंदे यांना बोलावुन त्या दोघांनी बराकीमध्ये जाऊन पाहिले असता संपूर्ण बराकीमध्ये कांद्यावर युरिया टाकलेला दिसून आला .
बाळासाहेब शिंदे यांनी पाच दिवसापूर्वी बराकीतील कांद्याची पहाणी केली असता त्यावेळेस कांदा सुस्थितीत होता. बुधवारी सकाळी त्यांना कांदा बराकीत युरिया टाकल्याचे आढळून आले . बुधवारी (दि.28 ) सकाळी शिंदे यांनी पोलिस पाटील संजय पोहकर यांना या घटनेची माहिती दिली . सरपंच गणेश यादव, उपसरपंच भरत म्हस्के, सुनिल शिंदे , पोलीस पाटील संजय पोहकर , प्रकाश पवार यांनी घटनास्थळी जाऊन कांदा बराकीची पहाणी केली .




























































