
सुयोग्य नियोजन केले तर बाणकोट वासीयांना पाणी पाणी करावे लागणार नाही मात्र प्रशासनाकडून पाणी सोडण्यासाठीचे धड नियोजनच नसल्याने बाणकोट वासीयांचे पाण्याविना हालच हाल होत आहेत.
मंडणगड तालूक्यातील बाणकोट या गावाला व्याघ्रेश्वरी येथील धरणातील जॅकवेलमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. व्याघ्रेश्वरी धरण हे वेळास हद्दीत आहे. या धरणातून बाणकोट या गावासह वाल्मीकिनगर तसेच वेळास गावालाही पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या पाऊस लांबल्याने धरणात पाणीसाठा म्हणावा तसा नसला तरी पाण्याचे योग्य नियोजन केले तर बाणकोटला पाण्याची टंचाई भासणार नाही. मात्र प्रशासनाकडे योग्य नियोजन नसल्याने बाणकोट वासीयांना पाण्याचे हाल सोसावे लागत आहेत.
बाणकोट गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या व्याघ्रेश्वरी धरणातील जॅकवेलमध्ये पाणी साठा उपलब्ध असल्याने बाणकोट गावाला पाण्याचा टॅंकर तालूक्यातून मंजूर होत नाही परिणामी टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत नाही. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या बाणकोटला नाही असे सिध्द होते. अशा या प्रकारामुळे बाणकोट गावाला पाणी समस्येची तीव्र टंचाई भासत असली तरी अजूनही पाण्याचा टॅंकर पुरवला गेला नाही. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाने बाणकोट गावातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी धरणात असलेल्या पाणी साठयाचे योग्य नियोजन करून पाण्याचा सुरळीतपणे पुरवठा करायला हवा मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे चार चार ,पाच पाच दिवसाने गावाला होणाऱ्या पाणी पुरवठयावर येथील लोकांना अवलंबून रहावे लागत आहे. बाणकोट गावाची खुप मोठी लोकसंख्या असल्याने चार ते पाच दिवसाने होणारा पाणी पुरवठा तसेच अपुरा होणारा पाणी पुरवठा यामुळे येथील लोक पुरते हैरान झाले आहेत. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत तरी किमान प्रशासनाने धरणात असलेल्या पाण्याचे निट नियोजन करावे आणि लोकांची तहान भागवण्याचे काम करावे किंवा मुबलक पाणी उपलब्ध होईपर्यंत तालूक्यातून टॅकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करावे अशाप्रकारची बाणकोट गावातून मागणी होत आहे.






























































