मंडणगड – सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसाने देव्हारेत अनेक घरांचे नुकसान

सुटलेला जोरदार वारा आणि कोसळलेल्या अवकाळी पावसाने देव्हारेतील अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निसर्ग चक्री वादळाची आठवण येथील लोकांना झाली.

मंडणगड तालूक्यातील देव्हारे ही एक नव्याने विकसित होणारी व्यापारी बाजारपेठ आहे. या व्यापारपेठ वजा देव्हारे गावाला सोमवारी 13 मे रोजी जोरदार सुटलेल्या वा-याने घरांच्या इमारती, गुरांचे गोठे, दुकानांच्या शेड, गाळे, शासकिय इमारती यांची पडझाड करून नुकसानीचा चांगलाच दणका दिला. त्यामुळे यात अनेकांचे आर्थिक नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत याबाबतच शासनस्तरावरून रितसर पंचनामे करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.

देव्हारे येथील विशेषतः रामचंद्र सोनु फराटे यांच्या घराची कौले वा-याने उडाल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या चुलत्यांच्या नावे असलेल्या गुरांच्या गोठयाचेही खुपच मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे सिमा मोहन देशपांडे यांच्या जनरल वस्तु मिळणा-या स्टोअर्सच्या दुकानाचे सर्व पत्रे वा-याने उडवल्यामुळे त्यांच्या दुकानातील सर्वच किंमती वस्तू भिजल्याने त्यांचे मोठयाप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू होते. पंचनामे झाल्यानंतरच देव्हारेत कोणा कोणाच्या घरांचे गुरांच्या गोठयांचे , आंबा बागांचे तसेच दुकानांचे अथवा शासकिय इमारींचे नुकसान झाले आहे याची माहीती मिळणार आहे.