
महिन्यापूर्वी पाटकळ येथे घेतलेल्या बैठकीनंतर सरकारने कोणतीही हालचाल न केल्याने मंगळवारी निंबोणी येथे झालेल्या बैठकीत येत्या लोकसभा निवडणुकीत 24 गावे सहभागी होणार नाहीत व या गावांना कर्नाटकात सामील करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असा ठराव गावकऱ्यांनी केला.
शेती आणि पिण्याच्या पाण्याचे स्वातंत्र्या पासून चे आश्वासन मार्गी न लागल्याने 24 गावातील शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. राज्य सरकारने लोकसभा आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची कॅबिनेट पुढे मंजुरी व निधीची तरतूद नाही केली तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आचारसंहिता जाहीर होईल त्याच दिवशी 24 गावे जोडून घ्यावी यासाठी लवकरच 24 गावाचे शिष्ट मंडळ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या भेटीचे नियोजन करण्याचा ठरावही एकमताने करण्यात आला.
ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी जत मधील 65 गावाचे आंदोलन यशस्वी करून त्या गावांना मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला असल्याचे तुकाराम महाराजांनी सांगितले. बैठकीत बोलताना पांडुरंग चौगुले यांनी 2009 मध्ये टाकलेला बहिष्कार आंदोलनामुळे वीस गावची मंगळवेढा उपसा सिंचन योजना तयार झाली. दुष्काळी 24 गावांना दोन टीएमसी पाणी उपलब्ध झाली. आणि योजना अंतिम टप्प्यात आली. हे सर्व केवळ विविध आंदोलने व बहिष्कार याचमुळे झाले असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात निंबोणीचे सरपंच बिरुदेव घोगरे म्हणाले की, मंगळवेढ्याच्या दुष्काळी 24 गावात पाण्याची भीषण टंचाई आहे. तालुका दुष्काळ यादीत बसला नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचेही सांगितले. तर पाणी संघर्ष समितीचे अॅड. भारत पवार यांनी आंदोलनाशिवाय 24 गावांना न्याय मिळणार नसून राजकारणी विहिरीत ही चळवळ पुढे घेऊन जावा नक्की योजना मार्गी लागेल असे सांगितले. यावेळी लेंडवे चिंचाळेचे सरपंच गुंडा लेंडवे, खुपसंगीचे माजी सरपंच साजन पटेल, रड्डे चे एड. रविकिरण कोळेकर, खडकीचे नानासाहेब कटारे, खवेचे संग्राम दुधाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा. येताळा भगत, सजग नागरिक संघाचे अध्यक्ष संजय कट्टे, खडकी चे सरपंच संजय राजपूत, उपसरपंच अशोक जाधव , हाजापुरचे माधवानंद आकळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, जित्तीचे माजी सरपंच शिवाजी सावंत, विष्णू मासाळ, चंद्रकांत गरंडे येड्रावचे दौलत माने, रमेश पाटील, खुपसंगीचे ग्रापसदस्य रामचंद्र तांबे, भाळवणी माजी सरपंच ज्ञानेश्वर भंडगे, अशोक माने, महेश पाटील ,सलीम शेख, चंद्रकांत ढगे, तुळशीदास मुठेकर , हिरालाल शेख, येसप्पा ढगे, नामदेव म्हारनूर आदीसह 24 गावातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























































