माणगंगा नदी स्वच्छतेचा 66 कि.मी.चा टप्पा पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माणगंगा भ्रमणसेवा संस्था आणि श्री बृहद भारत समाजसेवा संस्था यांनी 2016 सालापासून सुरू केलेल्या माणगंगा नदी स्वच्छता व पुनर्जीवन कार्यात आतापर्यंत सांगोला आणि आटपाडी तालुक्यातील 66 कि.मी.चा टप्पा पूर्ण झाला आहे.

चालू वर्षात 2021 मध्ये सद्गुरू श्री श्री साखर कारखाना राजेवाडी व नाम फाउंडेशन यांचा सहभाग मिळाल्याने या वर्षात आटपाडी तालुक्यातील 22 कि. मी. व सांगोला तालुक्यातील 5.5 कि. मी. असे एकूण 27.5 कि. मी. माणगंगा नदीचे पात्र व त्याबरोबरच सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. अशी माहिती माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी दिली.

घेंगडे म्हणाले की, सन 2016 पासून सुरू केलेल्या माणगंगा स्वच्छता व पुनर्जीवनाचे काम 2020 पर्यंत सांगोला तालुक्यातील 38.5 कि.मी.चे नदीपात्र व अकरा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे स्वच्छ करण्यात आले होते. चालू वर्षात आटपाडी तालुक्यातील माण नदीपात्र स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. या कामासाठी आटपाडी तालुक्यातून आमदार अनिल बाबर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तानाजी पाटील, तर सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन शेषराव अंकल यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक दत्ता खरात, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक गणेश थोरात, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक राजाभाऊ वाघमारे यांच्या परिश्रमामुळे 27.5 कि.मी.चे नदीपात्र व सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे स्वच्छ झाले आहेत. आतापर्यंत राजेवाडी ते सावे अखंड 66 कि. मी. नदीपात्र व अठरा को. प. बंधारे स्वच्छ करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून झाले आहे. या कामात प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार सचिन मुळीक यांचे मार्गदर्शन लाभले.

सन 2022 सालात सावे ते गुंजेगाव (ता. मंगळवेढा) या 14 कि. मी. माण नदीपात्राची स्वच्छता करून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये 80 किमी नदीपात्राची स्वच्छता करण्याचे उद्दिष्ट आहे, असेही वैजिनाथ घोंगडे यानी सांगितले.