चित्रकला,संगीत आणि सूर्यनमस्कार!

आताच्या अवघड काळात कलेचे सखोल रूप समजून घेण्याचा प्रयत्न केला. आरोग्य आणि कला यांचा उत्तम समन्वय साधता आला.

>> मंगेश बोरगावकर (गायक)

मार्चमध्ये आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव व्हायला लागला तेव्हापासूनच सामाजिक अंतर राखणे, बाहेरून आल्यानंतर स्वतःची स्वच्छता राखणे या प्राथमिक गोष्टी पाळायला लागलो आणि आम्हाला त्याचा परिणामही जाणवला. त्यामुळेच आम्ही आजपर्यंत या रोगापासून सुखरूप आहोत. प्राथमिक काळजी घेण्याच्या गरजा आम्ही घरी राहून सांभाळल्या. सध्या आरोग्याची विशेष काळजी आम्ही घेत आहोत. त्यातही आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल आणि त्याकरिता आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याकडे आमचा कल वाढत आहे. याचाही चांगला प्रभाव दिसून येतो. यासोबतच सूर्यनमस्कार करायला मला खूप आवडतात. ते यानिमित्ताने अजून छान पद्धतीने मी करू शकलो. यासोबतच ताजे अन्न, शिवाय अन्नात कमी तेलाचा समावेश कलाकार म्हणून आम्ही ज्या गोष्टी पाळत आलो, त्याच पुन्हा नव्याने कोरोनाच्या निमित्ताने आचरणात आणण्याची संधी मिळाली.

मला चित्रकला खूप आवडते. चित्रकलेची आवड या काळात जोपासता आली. माझ्या घरात ज्याप्रमाणे संगीताचा वारसा आहे, त्याप्रमाणे चित्रकलेचाही वारसा आहे. माझी आई, मावशी व्यवसायाने चित्रकार आहेत. यानिमित्ताने या कलेचाही आनंद, त्यातले बारकावे मला समजून घेता आले. तसेच नव्या पुस्तकांचं वाचन करायलाही भरपूर वेळ मिळाला. काही विशेष लेखक… यामध्ये पु. ल. देशपांडे, व.पु. काळे , विंदा करंदीकरांच्या, सुरेश भटांच्या कविता वाचायला मला खूप आवडतात. अशा प्रकारचा वाचनानंदही अनुभवण्याची संधी मिळाली. सध्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे पुस्तक वाचतोय. कित्येकदा हे पुस्तक वाचलंय. तरीही ते मला पुनः पुन्हा वाचावंसं वाटतं.

लॉकडाऊनच्या या एवढय़ा महिन्यांच्या काळात मला एक गोष्ट जाणली की, एक कलाकार म्हणून ज्या गोष्टी आपल्याकडून अजून छान होऊ शकतात, गाण्यात, कलेत प्रगतीसाठी अजून वाव आहे, अशा बारकाव्यांचा, कौशल्याचा सुरुवातीच्या महिन्यांत खूप अभ्यास करत होतो. कलाकार म्हणून माझ्यात ज्या सुधारणा होणं आवश्यक आहे, त्यावर रियाज करण्यास वाव मिळाला. या काळात आम्ही सर्वच कलाकार रसिकांसाठी फेसबुक लाईव्ह येत होतो. आपली कला रसिक प्रेक्षकांसमोर सादर करत होतो. मला वाटतं, या आधुनिक माध्यमामुळे मला कलाकार म्हणून या नव्या गोष्टीचा आनंद घेता आला. रसिक आणि आमच्या सोबतचा बॉण्ड या निमित्ताने कायम राहिला. त्यामुळे सोशल मीडियासारख्या आधुनिक माध्यमाला याचं क्रेडिट देता यायला हवं. त्यामुळे स्वतःलाही खूप शिकता आलं. माझे खूप लाईव्ह सेशन्स झाले. या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचता आलं. माझी तीन नवीन गाणी कोरोना काळात रिलीज झाली.

आपली प्रतिक्रिया द्या