ललित – पंडित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश उदगीरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते.  हे  तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी. 

काय काका, काय चाललंय?’’ किनऱया, बायकी आवाजात आलेला हा प्रश्न मला नेहमीच सावध करीत आलेला आहे. या प्रश्नापाठोपाठ जेमतेम पाच फूट दोन इंचांची उंची, डोक्यावरचे विरळ, विस्कटलेले केस, पातळ भुवयांखालचे चमकणारे डोळे, सरळ नाकाखाली पसरट जिवणी, दाढी घोटून घोटून सावळ्या वर्णातही हिरवटपणा कमावलेला, भरीत भर गालफडाची हाडे वर आलेली ही बटुमूर्ती प्रकट होऊन जाते. कमरेखाली आखूड पाय आणि उंच धड या अलौकिक शरीरयष्टीत इनशर्ट केलेला. याला पाहिला की, मला लांबट मांडववांग्याला दोन देठ फुटावेत तसा भास होऊन जातो. तिशीच्या आसपास असणाऱया या देहाला मी ‘पंडित’ या नावाने ओळखतो. या आखूड देहाचे जर वैशिष्टय़ असेल तर आत्मविश्वास ! त्या दिवशी सुजलेल्या तोंडाने समोर आला.

‘‘काय झालं?’’ मी धास्तावून विचारलं.

‘‘हां! हां! काही नाही!’ पसरट हसत तो बोलला.

‘‘मग तोंड का सुजलंय?’’

‘‘नेहमीचाच! कोपऱयावरच्या मंदिराशेजारी एक जण लघवी करताना दिसला. मी त्याला हटकला!’’

‘‘मग?’’

‘‘तो म्हणाला, मंदिर तो बहोत दूर है! मला संताप आला, मग मी सरळ त्याच्या कानाखाली जाळ काढला!’’

‘‘है शाबास!’’ त्याच्या नाजूक हाताकडे काळजीने पाहत मी उद्गारलो.

‘‘मग ? सोडतो की काय साल्याला!’’

‘‘मग काय झालं ?’’

‘‘काय होणार ? त्याने मला थोबाडले! मी त्याला एकच लगावली होती, पण त्याने मोजून पाच हाणल्या!’’

‘‘पंडित ! अशी भांडणे अंगावर का घेता ?’’

‘‘का म्हणजे ? जागरूक नागरिक आहे मी ! आपल्याला नाही सहन होत!’’

गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता.

एकदा माझ्या घरी मी निवांत गाणे गुणगुणत पेपर चाळत होतो, तेवढय़ात याची एंट्री झाली. ‘‘काका, तुम्हाला गाणं येतं?’’

‘‘नाही रे मित्रा! उगी आपलं सहज….’’

‘‘मी ऐकत होतो, पण मधे तुम्ही थोडे बेसूर झाला होता! हे गाणं असं आहे!’’ असं म्हणून त्याने विव्हळल्यासारखा सूर काढला.

‘‘वा!’’ अंगभूत सौजन्याने मी त्याला दाद दिली आणि तो चेकाळला. नंतर त्याने रात्रीच्या शांत वेळी कुत्री रडतात तशा आवाजात एकामागून एक गाणी सुरू केली. थोडय़ा वेळानं तो बंद पडला.

‘‘काका ! कसा वाटला माझा आवाज?’’

‘‘स्वर्गीय!’’

‘‘उगीच विशारद नाही झालो!’’

‘‘तुम्ही विशारद आहात?’’ मनातल्या मनात याला पदवी देणाऱयाला साष्टांग नमस्कार घालत विचारले.

‘‘त्याशिवाय आवाज एवढा तयार होऊ शकतो का ?’’ या बिनतोड प्रश्नाला उत्तर नव्हते.

परवा दाढीचे खुंट वाढलेल्या अवस्थेत भेटला.

‘‘काय पंडित ! बरंय ना ?’’ मी आस्थेने विचारले.

‘‘…! साला स्वतःला समजतो कोण ?’’ बेरकी शिवी हासडून त्याने डोळे गरगर फिरवले.

‘‘काय झालं ?’’ आजूबाजूचे संशयाने पाहायला लागले.

‘‘साला आमचा मॅनेजर ! मला म्हणतो, तू टार्गेट पूर्ण केलं नाहीस! मग काय त्याच्या तोंडावर रिपोर्ट फेकले. तरीही म्हणतो, माझ्या मनासारखं काम झालं नाही. सरळ त्याच्या थोबाडावर रेसिग्नेशन फेकलं आणि निघून आलो!’’

‘‘ आता पुढे काय ?’’

‘‘तू नही और सही, और नही और सही!’’ तो विव्हळला!

‘‘च्यायला, ही पंधरावी नोकरी सोडली. मेहनत करनेवालों को कैसा डर ?’’ वाळकुंजे हात हवेत फेकत तो चिरकला!

‘‘फिकर नॉट ! मै जिंदगी का साथ निभाता….’’

रस्त्यावर पडलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरून पडावे तसा हा अवचित अपघाताने माझ्या आयुष्यात आला. तसे पाहिले तर त्याच्या दुपटीनेही जास्त वयाचा मी, पण नकळत जवळचा होऊन गेला. त्याच्या संदर्भात सुरुवातीला वाटणारी चीड, संताप हळूहळू निवळत गेले. उलट दोन-चार दिवस दिसला नाही तर त्याची आठवण येऊ लागली! तो कधीच कुठे स्थिर होऊ शकला नाही, दरवेळी त्याचा व्यवसाय, नोकरी बदललेली असायची. तरीही हा माझ्या सहवासात टिकून राहिला की मी त्याच्या हा संशोधनाची बाब ठरावी. पण एक गोष्ट खरी, एक व्यक्ती म्हणून एकाच वेळी हवासा, नकोसा याच्या सीमारेषेवर हा तोल सांभाळत उभा असताना कधी हवासा होऊन गेला हे मलाही कळले नाही. आयुष्यभर एकाच नोकरीवर टिकून राहिलेला, माझ्या अंगात मुरलेला मध्यमवर्गीय कारकुंडेपणा या चिमुकल्या देहातल्या बेगुमानपणावर भाळला असावा.

[email protected]