तमाशा कलावंत मंगला बनसोडेंचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; अन्नधान्य, साड्या, ब्लँकेटची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणात गेल्या आठवडाभरापासून पुराचे थैमान सुरू आहे. आता पूर ओसरू लागला असला तरीही पूरानंतर उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांची भिती कायम आहे. पूरपरिस्थिती उद्भवल्यानंतर राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे खारीचा वाटा उचलत आहे. यात लोककलेसाठी अवघे आयुष्य वेचलेल्या तमाशा कलावंत मंगला बनसोडे या देखील मागे नाहीत. त्यांनी देखील आपला आयुष्यभराच्या कमाईचा मोठा भाग पूरग्रस्तांना दिला आहे.

लोककलेसाठी अवघे आयुष्य वेचलेल्या तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि कलावंतांनी कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्तांना मोठी मदत पाठवली आहे. यासाठी त्यांना त्यांच्या मुलांची आणि कुटुंबाचीही साथ मिळत आहे. ज्या रसिकांनी आयुष्यभर मंगलाताई यांच्या कलेचा सन्मान केला ते नागरिक आज पुरात जगण्यामरण्याची लढाई देत असताना मंगलाताईंना दु:ख झाले आहे. आयुष्यभराच्या कमाईचा मोठा भाग पूरग्रस्तांना मंगलाताई यांनी दिला आहे.

मंगला बनसोडे व नितीन कुमार तमाशा लोककलावंत यांनी खारीचा वाटा म्हणून माणुसकीच्या नात्याने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 5000 जणांचे अन्नधान्य आणि1500 फूड पॅकेट, पाणी बाटली, 1000 साडया, 200 ब्लँकेट, चादरी, कपडे पूरग्रस्तांना पाठवले आहे. पूर परिस्थती असेपर्यंत मदत कार्य सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.