
मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनाचा बळी जाणार असल्याचा आरोप करीत वर्सोवातील काही रहिवशांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने एमएमआरडीएसह पालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान हायकोर्टाने बांधकामाला दिलेली स्थगिती चार आठवडय़ांसाठी कायम राहणार आहे.
वर्सोवा ते लोखंडवाला या प्रस्थावीत मार्गाच्या बांधकाम प्रकरणी वर्सोवा येथील जय भारत सोसायटीला नोटीस बजावली आहे. या बांधकामामुळे येथील कांदळवन बाधित होणार असून कामामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होणार आहे. त्यामुळे सोसायटीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करून काम करण्यात येत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्या वेळेस खंडपीठाने याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली तसेच प्रतिवाद्यांना या प्रकरणी प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्याचे आदेश देत सुनावणी चार आठवडय़ांसाठी तहकूब केली.


























































