
मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील हरोथेल गावात गुरुवारी सकाळी सुरक्षा कर्मचार्यांशी झालेल्या चकमकीत दोन संशयित दंगलखोर ठार झाले असून आणि पाच जण जखमी झाले आहेत. लष्कराच्या म्हणण्यानुसार आणखी एक दंगलखोर ठार झाला आहे, परंतु घटनास्थळी अधूनमधून गोळीबार होत असल्याने मृतदेह अद्याप ताब्यात मिळाला नाही. हा परिसर राजधानी इंफाळपासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे.
ही घटना झाल्यानंतर मारले गेलेल्या दंगलखोरांच्या समुदायातील सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत मृतदेहासह मोर्चा काढण्याची धमकी दिली. मात्र, पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यापासून रोखले. यामुळे मोर्चात सहभागी झालेले लोक हिंसक झाले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला.
या जमावाने भाजप कार्यालयावरही हल्ला केला. त्यामुळे भाजपच्या प्रदेश कार्यालयाजवळ सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले. लष्कराच्या अधिकृत ट्विटर हँडल स्पियर कॉर्प्सने सांगितले की, सशस्त्र दंगलखोरांनी पहाटे 5:30 वाजता विनाकारण गोळीबार सुरू केला. परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून या भागात तत्काळ फौजफाटा तैनात करण्यात आला. यावेळी दंगलखोरांच्या गोळीबाराला लाजकाराने प्रभावी प्रत्युत्तर दिले. यानंतर गोळीबार थांबला असून आता या भागातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.


























































